नक्षल कमांडर गणेश उइके चकमकीत ठार, एक कोटीचा होता इनाम

ओडिशामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नक्षलवाद्यांचा नेता गणेश उइके हा चकमकीत ठार झाला आहे. गणेश उइकेवर सरकारने १.१ कोटीचा इनाम घोषित केला होता. कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचा नेता गणेश उइकेसह त्याचे तीन साथीदार ठार झाले आहेत. ही चकमक गुरुवारी चकापाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

गणेश उइके हा माकपच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. ओडिशामधील नक्षलवाद्यांच्या गटाचा तो प्रमुख असल्याचे बोलले जात होते. त्याच्यावर सरकारने १.१ कोटीचा इनाम जाहीर केला होता. गणेश उइके हा ६९ वर्षांचा होता. तो मूळचा तेलंगणमधील नालगोंडा जिल्ह्यातील चेंदूल मंडलमधील पुललेमाला गावातला राहणारा होता. गणेश उइके हा पक्का हनुमंत, राजेश तिवारी, चमरू आणि रुपा यासह इतर अनेक नावांनी ओळखला जायचा.

चकमकीत ठार झालेल्या त्याच्या तीन साथीदारांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चकमकीनंतर परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांकडून शोध मोहीम सुरू आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांकडून संयुक्त मोहीम राबवण्यात आली. सुरक्षा दलाच्या जवानांना बघतातच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांच्या जवानांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार केला. या कारवाईत चार नक्षलवादी ठार झाले.

गणेश उइके ओडिशात होता अ‍ॅक्टिव्ह

गणेश उइके हा दीर्घ काळापासून ओडिशामध्ये अ‍ॅक्टिव्ह होता. नक्षलवादी संघटनेत त्याची मोठी भूमिका होता. त्याच्यावर ओडिशाची जबाबदारी देण्यात आली होती. ओडिशासह छत्तीसगडमध्येही तो अ‍ॅक्टिव्ह होता. गणेश उइके याला ७ राज्यांमध्ये वॉन्टेड होता. आता तो चकमकीत मारला गेला आहे.