
मागील वर्षी तनिषा भिसे या गर्भवती महिलेवर वेळेवर उपचार न केल्याने आणि दुसऱया रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा न दिल्यामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तालयाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला दोषी ठरवले आहे. पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नामांकित धर्मादाय रुग्णालयाविरोधात इतकी कठोर कारवाई करण्यात आली आहे.
रुग्णालय प्रशासनाने आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात टाळाटाळ केली, तसेच वेळेत दुसऱया रुग्णालयात हलवण्यासाठी आवश्यक व्यवस्था न केल्याचे धर्मादाय आयुक्तलयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गेल्यावर्षी घडली होती. रुग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितला होती. ही रक्कम न भरल्याने वेळेवर उपचार कsले नाहीत. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी पैशांअभावी उपचार नाकारल्याचा आरोप केला होता.


























































