
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात मंगळवारी झालेले मिनी नाट्य संमेलन ‘मराठी माणूस’, ‘बिनविरोध’मुळे चांगलेच रंगले आणि प्रेक्षकांची निखळ करमणूक झाली. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेल्या मिनी नाटय़ संमेलन – एक सांस्कृतिक जल्लोष या कार्यक्रमात विविध नाटय़ कलाकारांनी भाग घेऊन रंगत आणली.
अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक विराजस कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मिनी नाटय़संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव होते. यावेळी अभिनेते भरत जाधव यांनी ‘सही रे सही’ या नाटकातल्या भूमिकेचे पाच हजार प्रयोग पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मानही करण्यात आला.
यावेळी पालिका निवडणुकीतील बिनविरोध निवडीवरून वक्त्यांनी आणि कलाकारांनी टक्केटोणपे मारून प्रेक्षकांना हसवले, तर अशोक मुळय़े यांनी आपल्या भाषणातून मराठी माणूस एकत्र आला पाहिजे असे ठामपणे सांगत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कोपरखळ्या मारल्या. शंभराव्या मराठी नाटय संमेलनाची उत्सुकता असतानाच आपण हे मिनी नाटय़संमेलन कशासाठी आयोजित केले याविषयी अशोक मुळ्ये यांनी माहिती दिली.
चांगल्या आणि दर्जेदार नाटकांना रसिकांची वाहवा मिळत असून मराठी नाटकांनी त्यांची स्पर्धा आता ओटीटीवरच्या वाहिन्यांशी आहे असे लक्षात ठेवावे, असे मत विराजस कुलकर्णी यांनी मांडले. मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपली संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन ज्ञानेश महाराव यांनी केले. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमात भावगीते, चित्रपट गीते, नृत्याविष्कार अशी कार्यक्रमांची रेलचेल होती.
लेखक, दिग्दर्शक संतोष पवार यांनी अशोक मुळ्ये यांच्यावरचे विनोदी प्रहसन सादर करून प्रेक्षकांना हसवले. हे मिनी नाटय़ संमेलन ‘बिनविरोध’ असून यातील रंगमंचावरच्या सगळ्याच कलाकार आणि प्रेक्षकांनासुद्धा मुळय़े काकांचा आदेश आला की बिनविरोध उपस्थित राहावे लागते, असे ते म्हणाले.
































































