
गुजरातमधील ‘आका’ यांना मुंबई हवी आहे, कारण मुंबई ताब्यात आली तर महाराष्ट्र ताब्यात राहील, अशी भाजपची भूमिका असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण, मंत्र्यांच्या संपत्तीत झालेली वाढ, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा अहवाल इत्यादी मुद्यांवरून भाजपवर कडाडून टीका केली.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार म्हणाले, भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई ताब्यात हवी आहे, मात्र हा ताबा मुंबईकरांच्या विकासासाठी नसून गुजरातच्या दावणीला मुंबई बांधण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमधील ‘आक्यांना’ मुंबई हवी आहे, कारण मुंबई ताब्यात आली तर महाराष्ट्र ताब्यात राहील, अशी भाजपची भूमिका आहे. भविष्यात महाराष्ट्र महाराष्ट्रीयन जनतेचा राहील का, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱयांच्या आशीर्वादानेच सुरू होता. त्याचा अहवाल सोयीचा होता, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
…तर भाजप कुठेही जिंकणार नाही
निवडणुकांमध्ये भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून वडेट्टीवार म्हणाले, की प्रशासन, तपास यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्थेचा वापर केला नाही, तर भाजप कुठेही जिंकू शकणार नाही. भाजप 51 टक्के मतांचे स्वप्न पाहत आहे, मात्र निवडणूक आयोगाने आपले काम नीट केले तर भाजपची सत्ता येणार नाही, असा दावा त्यांनी केला.
बदलापूर प्रकरणावरून भाजपवर आरोप
बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला भाजपकडून नगरसेवक बनवण्यात आल्यावर वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शाळा व्यवस्थापन आणि संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मी केली होती. महिलांना गृहीत धरून सत्तेसाठी भाजप खालच्या थराला जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.





























































