
संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार (40) याने आज आपल्या शेतामधील राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. 4 दिवसांपूर्वीच 13 महिन्यांनंतर न्यायालयाने त्याला जामिनावर सोडले होते. जामिनावर आल्यानंतर गावात त्याच्याशी कोणीही बोलत नव्हते. घरच्या लोकांशीही त्याचे पटत नव्हते. आज त्याचा मृतदेह घरातील लोखंडी आडूला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या आत्महत्येबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले असून काही लोकांनी शंकाही व्यक्त केली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात अशीही कुजबुज सुरू आहे.
शहरात 10 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काचेच्या पेटीत ठेवलेल्या संविधानाची प्रतिकृती फोडून विटंबना केली होती. घटनास्थळी उपस्थित आंबेडकर अनुयायांनी आरोपी दत्ता सोपान पवार यास बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात मुख्य आरोपी दत्ता सोपान पवार हा कारागृहातून 4 दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेला होता. त्याच्या जामिनासाठी परभणी न्यायालयातून कुणीही पुढे आले नव्हते. त्यामुळे तब्बल 13 महिने तो कारागृहात राहिला. परभणी तालुक्यातील मिर्झापूर येथील तो रहिवासी आहे. त्याने आज सकाळी 8 वाजता आपल्या शेतातील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

























































