
मनमाड-चांदवड रस्त्यावर बुधवारी सकाळी विटा वाहून नेणारा ट्रक उलटला, त्यातील मजूर विटांच्या ढिगाऱयाखाली दबले गेले. या भीषण अपघातात महिला व तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत.
मनमाड-चांदवड रस्त्यावरील भारत पेट्रोलियमसमोरील बांधकामाच्या ठिकाणी विटा पोहोचवण्यासाठी नांदगाव तालुक्यातील नागापूर येथून सकाळी ट्रक जात होता. त्या विटांच्या ढिगाऱयावर मजूर रंजीत सोळंकी (19), राजेश सोळंकी (24), राजेशची पत्नी रोमिता (22), मुले दीपक (5), रियान (2) व सारदी सोळंकी (22) बसले होते. चांदवडजवळ एका कांद्याच्या खळ्यासमोर साडेअकराच्या सुमारास अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उलटला. पाठीमागील सर्व मजूर व मुले विटांच्या ढिगाऱयाखाली गाडले गेले. स्थानिकांनी अपघात स्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ही माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक पैलास वाघ पथकासह दाखल झाले.



























































