अमेरिकेत देहविक्री आणि ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, हिंदुस्थानी वंशाच्या दाम्पत्यासह पाच जणांना अटक

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात एका धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे. एका हॉटेलच्या नावाखाली अमली पदार्थांची विक्री आणि देहविक्रीचा व्यवसाय चालवल्याप्रकरणी हिंदुस्थानी वंशाच्या दाम्पत्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोशा शर्मा (52) आणि तरुण शर्मा (55) अशी या दाम्पत्याची नावे असून, त्यांनी आपल्या ‘रेड कार्पेट इन’ या हॉटेलचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केल्याचा आरोप फेडरल एजंट्सनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य हॉटेलच्या तिसऱ्या मजल्याचा वापर अंमली पदार्थांची विक्री आणि वेश्या व्यवसायासाठी करत होते. तर खालच्या मजल्यांवर सामान्य लोकांची व्यवस्था केली जात असे. कोशा शर्मा हिला ‘मा’ किंवा ‘मम्मा के’ आणि तरुण शर्मा याला ‘पॉप’ किंवा ‘पा’ या नावांनी ओळखले जात होते. मे 2023 पासून हे दाम्पत्य या हॉटेलच्या माध्यमातून या अवैध्य गोष्टी करत असल्याचे समोर आले आहे.

कोशा शर्मा ग्राहकांना तिसऱ्या मजल्यावर पाठवायची आणि पोलीस आल्यास गुन्हेगारांना सावध करण्याचे काम करायची. अनेकदा तिने पोलिसांना खोल्यांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्याचेही तपासात उघड झाले आहे. या कारवाईत मार्गो पियर्स (51), जोशुआ रेडिक (40) आणि रशार्ड स्मिथ (33) या इतर तीन आरोपींनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मे ते ऑगस्ट 2025 दरम्यान ‘एफबीआय’ (FBI) आणि स्थानिक पोलिसांनी नऊ वेळा ग्राहक आणि दलाल बनून या हॉटेलवर छापा टाकला. येथे किमान आठ महिलांकडून सक्तीने देहविक्री करून घेतली जात होती. या महिलांना हॉटेलबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. तसेच त्यांना शारीरिक त्रासही दिला जात होता.
याशिवाय, काही एजंट्सनी 15 प्रकारचे अमली पदार्थ खरेदी केले होते.

सध्या या पाचही जणांवर अंमली पदार्थांची तस्करी आणि देहविक्रीचा व्यवसाय चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. जर हे आरोप सिद्ध झाले, तर त्यांना किमान 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अमेरिकन फेडरल कोर्ट लवकरच यावर अंतिम निकाल देणार आहे.