26 जानेवारीला लॉग वीकएन्डला फिरायला जाण्याचा बेत आहे? या ठिकाणी जाताना घ्या काळजी

वीकएन्डला जोडून एकादी सुट्टी आली की अनेकांचे फिरण्याचे प्लॅन्स बनतात. आता प्रजासत्ताक दिनाला जोडून शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या आल्यामुळे अनेकांनी हा बेत आखला असेल. या लाँग विकेंडसाठी अनेकजण डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा आनंद घेण्याचे नियोजन करतील. मात्र हा प्रवास तुमच्यासाठी थोडा अडचणींचा ठरू शकतो.

सध्या डोंगराळ राज्यांमध्ये हवामानात बदल झाले आहेत. ल्यामुळे अनेक पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने (IMD) पर्यटनासाठी हा काळ अत्यंत अडचींचा असल्याचे सांगत इशारा जारी केला आहे. हवामान बदलामुळे तुमची सहल सुखावह होण्याऐवजी संकटाची ठरू शकते, त्यामुळे प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

कश्मीरमध्ये सध्या हवामानाची स्थिती बिकट असून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे विमान सेवेवर परिणाम झाला आहे. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे आणि दृश्यमानता (Visibility) कमी झाल्यामुळे 26 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. टेकऑफ आणि लँडिंग करणे शक्य नसल्याने इंडिगो आणि स्पाइसजेटसारख्या विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइट स्टेटस तपासण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये बर्फाची पांढरी चादर पसरली असली, तरी रस्ते बंद होणे आणि निसरड्या रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा ‘अलर्ट’ देण्यात आला आहे.

केवळ डोंगराळ भागातच नव्हे, तर दिल्ली-एनसीआर, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांसारख्या मैदानी प्रदेशांतही हवामान बदलाचा धोका कायम आहे. या भागात 30 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणारे थंड वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीची (Hailstorm) शक्यता वर्तवण्यात आली आहे. खराब हवामानामुळे प्रवासात अडथळे येऊ शकतात आणि कडाक्याच्या थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारीही उद्भवू शकतात. त्यामुळे पर्यटकांनी सध्याचा धोका लक्षात घेऊन आपली सहल काही दिवसांसाठी पुढे ढकलणेच हिताचे ठरेल.