
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. चिलुवुरु गावातील एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. लक्ष्मी माधुरी असे आरोपी महिलेचे नाव असून तिने पती लोकम शिवनगरजू यांच्या जेवणात, म्हणजेच बिर्याणीत झोपेच्या गोळ्यांची पूड मिसळून त्यांना बेशुद्ध केले आणि त्यानंतर यानंतर नवऱ्याच्या तोडांवर उशी दाबून त्याचा जीव घेतला. एवढ्यावरच ती महिला थांबली नाही तर तिने मृत पतीच्या बाजूलाच बसून रात्रभर अश्लील फिल्म पाहिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी माधुरीचे गोपी नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने तिने पतीचा काटा काढण्याचे ठरवले. घटनेच्या रात्री तिने पतीसाठी खास बिर्याणी बनवली, त्यात तिने झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. जेवण केल्यानंतर शिवनगरजू गाढ झोपेत गेल्यानंतर लक्ष्मीने प्रियकर गोपीला घरी बोलावले. त्यानंतर दोघांनी मिळून झोपलेल्या शिवनगरजू यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा जीव घेतला.
ही हत्या केल्यानंतर लक्ष्मीने अतिशय धूर्तपणे हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. तिने गावात आपल्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अफवा पसरवली. पहाटेच्या सुमारास तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जमा केले आणि पतीचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, मृतदेहाचे निरीक्षण करताना शिवनगरजू यांच्या वडिलांना आणि मित्रांना शरीरावर जखमांच्या खुणा आणि रक्ताचे डाग दिसल्याने संशय बळावला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता, फॉरेन्सिक अहवालात मृत्यू नैसर्गिक नसून श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी लक्ष्मी आणि गोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, लक्ष्मीने आपला गुन्हा कबूल केला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या कटात अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने संपूर्ण आंध्र प्रदेशात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.


























































