
मेघालयमधील इस्ट जैंतिया हिल्स जिह्यातील एका अवैध कोळखा खाणीत आज भीषण स्फोट झाला. त्यात 18 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार खाणीत अडकल्याची दाट शक्यता आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी दिले आहेत.
थांग्स्पू भागातील खाणीत गुरुवारी सकाळी ही घटना घडली. पोलीस महासंचालक आय. नोंग्रांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला त्या वेळी खाणीत किती कामगार होते, हे माहिती नाही. आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतकांच्या वारसांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. मेघालयमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने वर्ष 2014मध्येच रॅट होल मायनिंग आणि इतर प्रकारच्या उत्खननावर बंदी घातली होती.

























































