
बडोदा येथे गुरुवारी रात्री झालेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) दिल्ली कॅपिटल्सवर शानदार विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने इतिहास रचला असून एकाच वेळी आयपीएल (IPL) आणि डब्ल्यूपीएल (WPL) या दोन्ही स्पर्धांचे विजेतेपद आपल्याकडे राखणारा हा पहिला संघ ठरला आहे. यावर स्मृती मानधनाने ‘ई साला कप नामदू’2 अशी प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. “पुन्हा एकदा चॅम्पियन्स! आरसीबीचा झेंडा असाच उंच ठेवत राहा, तुम्हा सर्वांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत कोहलीने स्मृती मानधना आणि संपूर्ण संघाचे कौतुक केले. 2024 मध्ये महिला संघाने पहिले विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2025 मध्ये पुरुषांच्या संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली आणि आता महिलांनी पुन्हा एकदा बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
View this post on Instagram
बडोद्यातील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा अंतिम सामना अत्यंत थरारक झाला. स्मृतीने अवघ्या 41 चेंडूत 87 धावांची आक्रमक खेळी करत दिल्लीच्या गोलंदाजीचा धुरळा उडवला. तिला जॉर्जिया व्होलने 79 धावा करत मोलाची साथ दिली. या दोघींनी 165 धावांची विक्रमी भागीदारी रचली. सामन्याच्या शेवटच्या षटकांत काही विकेट्स पडल्यामुळे उत्कंठा वाढली होती, परंतु आरसीबीने दोन चेंडू राखून हा ऐतिहासिक विजय मिळवला.
2025-26 हा काळ आरसीबीच्या चाहत्यांसाठी ‘सुवर्णकाळ’ ठरला आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पुरुषांच्या संघाने 18 वर्षांची प्रतीक्षा संपवून 2025 चे आयपीएल विजेतेपद मिळवले होते, तर आता स्मृतीच्या नेतृत्वाखाली महिला संघाने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलवर नाव कोरले आहे. एकाच वेळी दोन्ही महत्त्वाच्या लीगमध्ये चॅम्पियन राहण्याचा मान मिळवत आरसीबीने टी-20 क्रिकेटच्या विश्वात आपला नवा दबदबा निर्माण केला आहे.





























































