वर्ल्ड कप आपलाच आहे… आता जिंकायचंच!! जगज्जेतेपद राखण्यासाठी हिंदुस्थानचे धुरंधर सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश वरवडेकर 

मुंबई, दि. 6 – सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकवणाऱया टी-20 क्रिकेटच्या वर्ल्ड वॉरला सुरुवात होतेय. हरणार या भीतीने आधीच शेपूट घातलेला पाकिस्तान आपल्याविरुद्ध खेळणार नसला तरी हा वर्ल्ड कप आपलाच आहे… आणि तो आता जिंकायचाच, या एकमेव ध्येयाने हिंदुस्थानचा संघ अमेरिकेविरुद्ध उतरणार आहे. सामना अमेरिकेविरुद्ध असला तरी खेळणारे हिंदुस्थानी वंशाचे आहेत. म्हणजे सामना हिंदुस्थान विरुद्ध हिंदुस्थान असेल आणि सूर्यकुमारचा संघ वानखेडेवर विक्रमांचा अभिषेक करेल, असा पक्का विश्वास आहे.

हिंदुस्थान जगज्जेता आहे आणि जगज्जेता संघ आपल्या घरच्या मैदानावर जगज्जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला की क्रिकेटप्रेमींच्या काळजात आपसूक वर्ल्ड कप आपलाच हा एकच सूर उमटतो. हा आवाज सध्या स्टेडियमच्या गॅलरीत नाही, तो थेट हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या कानात, मनात आणि छातीत घुमतोय. उद्या तो वानखेडेवर पुन्हा एक बुलंद होईल.  पुढचे तब्बल 30 दिवस हा निनाद अवघ्या क्रिकेटविश्वात घुमणार, याची खात्री हिंदुस्थानी संघाच्या धुरंधरांनी आपल्या खेळातून आधीच दिली आहे. आता हीच आग, हीच धार आणि हाच आत्मविश्वास वर्ल्ड कपमध्ये प्रत्यक्षात उतरावा हीच तमाम हिंदुस्थानींची माफक अपेक्षा आहे.

हिंदुस्थानचा थेट सुपर एटमध्ये प्रवेश

हिंदुस्थान अमेरिकेचा फडशा पाडणार, हे कुणीही सांगू शकतो. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असला तरी वानखेडेवर या अनिश्चिततेला पाय ठेवायलाही मिळणार नाही. विशेष म्हणजे या विजयामुळे हिंदुस्थानी संघ सुपर एटचे दार उघडणार. कारण पाकिस्तानी संघाने आधीच माती खाल्ल्यामुळे हिंदुस्थानी संघाच्या गुणतालिकेत 2 गुण जमा झाले आहेत आणि अमेरिकेविरुद्धच्या विजयामुळे आणखी दोन गुण जमा होतील आणि हिंदुस्थानचा सुपर एट प्रवास पक्का होईल. या गटात हिंदुस्थानचा संघ दुबळ्या नामिबिया आणि नेदरलॅण्ड्स या संघाविरुद्ध खेळणार आहे. म्हणजेच सुपर एटमध्ये हमखास एक्स 1 असणारा हिंदुस्थानी संघ 22 फेब्रुवारीला अहमदाबादेत, 26 फेब्रुवारीला चेन्नईत आणि 1 मार्चला कोलकात्यात खेळणार, हेसुद्धा निश्चित झाले आहे. सुपर एटमधील हिंदुस्थानचा संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज या संघांशी भिडू शकतो. सर्वकाही हिंदुस्थानला पोषक वातावरण तयार झाले आहे. फक्त हे वातावरण पाकिस्तानी संघाने ऐन वेळी पसरी खाल्ली तर थोडे बदलू शकते.

300 धावांचे लक्ष्य

हिंदुस्थानी संघात एकापेक्षा एक असलेल्या धडाकेबाजांमुळे टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वप्रथम 300 धावांचे एव्हरेस्ट गाठू शकतो, असे भाकित सारेच करत आहेत. तो क्षण अमेरिकेविरुद्धही प्रत्यक्षात साकारला जाऊ शकतो. हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 297 धावांपर्यंत झेप घेतली होती आणि तो 300च्या आकडय़ापुढे गेला तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.

अभिषेक की इशानचे वादळ

हिंदुस्थानच्या जंगलात जशी वाघांची संख्या वाढतेय तशी हिंदुस्थानी संघात वादळांची संख्याही वाढतेय. कोणते वादळ कधी त्सुनामी होईल, याची शाश्वती नाही. सलामीला अभिषेक शर्मा घोंघावतोय. दुसऱया एण्डला इशान किशनही प्रतिस्पर्धी गोलंदाजीचा चेंदामेंदा उडवतोय आणि कर्णधार सूर्यकुमार यादवही आपल्या तलवाररुपी बॅटीने गोलंदाजांवर सपासप वार करतोय. त्यामुळे उद्या दुबळ्या अमेरिकेविरुद्ध यापैकी कोण पेटून उठेल, हे नक्की सांगता येत नसले तरी वानखेडेवर वादळ घोंघावणार हे निश्चित. सोबत धावांची, चौकारांची, षटकारांची आतषबाजी होणार म्हणजे होणार. ही आतषबाजी पाहण्यासाठी वानखेडे आधीच हाऊसफुल्ल झाले आहे.