भोसरी जमीन घोटाळा प्रकरण – एकनाथ खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज झटका दिला. विशेष कोर्टाने एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याप्रकरणी कोर्टात आरोपनिश्चितीची प्रक्रिया होणार होती. मात्र खडसे दाम्पत्य कोर्टात गैरहजर राहिल्यामुळे विशेष एमपीएमएलए कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

भाजप सरकारमध्ये मंत्री   असताना एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्या नावावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जमीन अल्प दरात खरेदी केली. 2016 मध्ये हा कथित गैरव्यवहार घडला होता. 3 डिसेंबर 2025 रोजी विशेष न्यायालयाने भोसरी येथील जमीन विक्रीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणात ईडीने त्यांच्या व कुटुंबियांविरोधात ईसीआयआर दाखल केला, तर नोंदवलेल्या गुह्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त करण्यास नकार देत विशेष न्यायालयाने 16 जानेवारी रोजी आरोपींवर आरोप निश्चित करणार असल्याचे स्पष्ट केले या निर्णयाला खडसे यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने खडसेंना अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला होता. आज सत्र न्यायालयात न्यायाधीश महेश जाधव यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने सुनावणीला हजर राहण्यापासून सूट द्यावी, असा अर्ज खडसेंच्या वकिलांकडून करण्यात आला. मात्र न्यायालयाने तो फेटाळला.