परीक्षण – आकांक्षेचे तेजस्वी प्रतीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> तृप्ती कुलकर्णी

तिहास आपल्याला खऱया अर्थाने फार कमी वेळा उमगतो हेच खरं. अनेकदा विशिष्ट घटना, काही निवडक व्यक्ती आणि त्यांच्या पराक्रमांचीच उजळणी होत राहते. मात्र त्या झगमगाटामागे आपले आयुष्य होरपळून गेलेले, न बोलता लढलेले आणि काळाच्या प्रवाहात गडप झालेले असंख्य चेहरे अंधारातच राहतात. 1857 च्या स्वातंत्र्यसमरातील कानपूरच्या तवायफ अजीजुनबाईच्या जीवनावर आधारित मिहाना प्रकाशनाची ऐतिहासिक कादंबरी ‘तेजस्विनी’ वाचताना अशाच एका विस्मरणात गेलेल्या, रक्तरंजित आणि वेदनांनी भरलेल्या पानावरून हात फिरवल्यासारखी जाणीव होते. त्या पानातून उसळून येणाऱया वेदना, संताप, करुणा आणि अभिमान या भावना वाचकाच्या मनात एकाच वेळी उसळून येतात व इतिहासाकडे पाहण्याची आपला नजरीया बदलून टाकतात.

सुप्रसिद्ध लेखक उदय जोशी यांना सावरकरांच्या 1857 चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथात अजीजुनबाईचा अल्पसा उल्लेख सापडला आणि त्याच ठिणगीतून त्यांनी ही तेजस्वी व्यक्तिरेखा शब्दांत घडवली आहे. राजगडच्या जहागीरदार समशेरसिंहांची कन्या अंजसा – क्षात्रतेजाने उजळलेली, रूपसंपन्न आणि स्वाभिमानी – इंग्रज शिपायांच्या विकृत नजरेला सापडते. जत्रेतून तिचा पाठलाग होतो, इज्जतीवर घाला घालण्याचा प्रयत्न होतो. ‘अब्रू गेली तर जगणं व्यर्थ’ या धगधगत्या भावनेतून ती मैत्रिणीसह नदीत झेपावते. जीव वाचतो, पण नियती तिच्यासाठी आणखी कठोर परीक्षा राखून ठेवते. मदतीच्या शोधात ती ज्या उंबरठ्यावर येते, तो उंबरठा तिला थेट तवायफेच्या कोठ्यावर घेऊन जातो आणि तिथून मागे फिरण्याचे सारे रस्ते कायमचे मिटून जातात. ज्या सन्मानासाठी तिने मृत्यूला कवटाळण्याचा प्रयत्न केला, तोच सन्मान समाज तिच्या हातातून निर्दयपणे हिसकावून घेतो.

परिस्थितीसमोर झुकून, धर्मांतर स्वीकारून, नाइलाजाने ती त्या जगण्यात स्वतला सामावून घेते, पण तिच्या मनात धगधगत राहणारा इंग्रजांविषयीचा द्वेष आणि अन्यायाविरुद्धची आग कधीच विझत नाही. सुभेदार शमसुद्दीनच्या प्रेमाने आणि विश्वासाने तिच्या अंतरातलं क्षात्रतेज पुन्हा चेतवतं. त्यातूनच ती तवायफींची ‘मस्तानी’ टोळी उभी करते आणि रणांगणावर शस्त्र हाती घेऊन उभी राहते. जहागीरदाराची कन्या ते उपेक्षित तवायफ आणि तिथून स्वातंत्र्यसैनिक असा अंजसाचा – अजीजुनबाईचा – प्रवास केवळ व्यक्तीचा नसून तो संपूर्ण स्त्राrजातीच्या संघर्षाचं, झगड्याचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक बनतो. या प्रवासात तत्कालीन समाजाची स्त्राrकडे पाहण्याची दृष्टी, पुरुषप्रधान मानसिकता आणि सोयीस्कर नैतिकतेची कुरूपता ठळकपणे उघडी पडते. या कादंबरीचं मोठं सामर्थ्य म्हणजे तवायफांसारख्या उपेक्षित स्त्रियांचं जगणं, त्यांचे घाव, त्यांची जिद्द आणि राष्ट्रासाठी दिलेलं योगदान हे अत्यंत मानवी, जिवंत स्वरूपात उभं करणं. इतिहास हा केवळ राजे, सेनापती किंवा राजकारणी घडवत नाही, तो अशा असंख्य अज्ञात हातांनी, अश्रूंनी आणि रक्ताने घडत असतो, ही जाणीव लेखक देतो.

‘तेजस्विनी’ वाचताना प्रकर्षाने उमगतं की, स्वातंत्र्य ही केवळ राष्ट्राची राजकीय संकल्पना नसून ती प्रत्येक माणसाच्या आत्मसन्मानाशी जोडलेली, अत्यंत वैयक्तिक आणि मूलभूत भावना आहे. अजीजुनबाईसाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांपासूनची मुक्तता नव्हे, तर अपमानातून, लादलेल्या ओळखीतून आणि अन्यायातून मुक्त होण्याचा लढा आहे. म्हणूनच तिचा संघर्ष इतिहासातील एक धूसर नोंद न राहता मानवी स्वातंत्र्याच्या शाश्वत आकांक्षेचं तेजस्वी प्रतीक ठरतो आणि याच अर्थाने ‘तेजस्विनी’ ही कादंबरी वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा, अंतर्मुख करणारा साहित्यिक अनुभव ठरते.

तेजस्विनी 

लेखक ः उदय जोशी

प्रकाशक ः मिहाना प्रकाशन

मूल्य ः 470 रुपये

पृष्ठे ः 600