
>> विक्रम मराठे
‘इंजिनस नेटिव्हः कथा एका मुरक्क्याची’ या डॉक्युड्रामाचा नववा प्रयोग नुकताच मुंबईत सादर झाला. काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये डॉक्युड्रामा विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगाची निर्मिती गवाक्ष, पुणेतर्फे करण्यात आली असून चित्रकार डॉ. नितीन हडप आणि अॅनिमेटर मकरंद सप्रे यांनी संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा डॉक्युड्रामा ते दोघे सादर करतात आणि प्रत्यक्ष 18 व्या शतकातील पुण्यातील अज्ञात चित्रकार गंगाराम तांबट त्याच्या कलाकृतींसोबत प्रेक्षकांसमोर उभा राहतो.
गंगाराम तांबट हा विस्मृतीत गेलेला पुण्यातील आणि भारतातील कला इतिहासातील चित्रकार. त्याचे वैशिष्टय़ हे की, तो पहिल्या फळीचा चित्रकार होतो, की ज्याने स्थानिक चित्र पद्धतीमध्ये काम केले आणि विदेशी चित्र पद्धत जेम्स वेल्स या ब्रिटिश चित्रकाराकडून शिकून घेतली, आत्मसात केली. होली शेपर्ड हिने या चित्रकाराचा थोडाफार अभ्यास केला होता. चित्रकार कोशात थोडी माहिती आहे, परंतु एक तासाचा पूर्ण कार्यक्रम करण्यासाठी नितीन आणि मकरंद याने बरेच संशोधन केले आहे. गंगारामने तत्कालीन समाजातील कुस्तीगीर, फकीर, वेडा, साधुसंत, बाळ अशा अनेक लोकांची व्यक्तिचित्रे केली आहेत. त्यातील कुस्तीगीर चित्रपट रूपात आपल्या समोर येतात. निसर्गचित्र प्रकारात पार्वती टेकडी, कैलास लेणे, भुलेश्वर मंदिर अशी चित्रे केली आहेत. याबरोबरच त्याने किडय़ापासून हत्तीपर्यंत अनेक प्राणी चित्रबद्ध केले आहेत. एखादा अपवाद वगळता पक्षी आणि स्त्रिया त्याच्या चित्रात दिसत नाहीत.
त्याचे गुरू आणि तो असे एक समूह व्यक्तिचित्र आहे, त्याद्वारे तो पगडी, उपरणे, धोतर अशा पोशाखात दिसून येतो. हेच व्यक्तिमत्त्व बरोबर डॉक्युड्रामात आपल्या समोर अवतरते. त्याने चित्रावर नाव, सहीप्रमाणे तारीखवार लिहिण्याची पद्धत अवलंबली होती. त्यामुळे त्याची चित्रे ओळख पटवितात. चित्रकार गंगारामची चित्रे सध्या अमेरिकेतील येल संग्रहालयात आहेत. त्या चित्रांवरून कालक्रम लावून आणि चित्र प्रक्रिया लक्षात घेऊन हा एक इतिहासपट तयार झाला आहे. भारतातील पहिली चित्रशाळा म्हणजे आर्ट स्कूल हे पुण्यात शनिवारवाडा येथे पेशवे यांच्या आश्रयाने सुरू झाले हे सत्य हा डॉक्युड्रामा आपल्या समोर प्रस्थापित करतो. कथनात्मक शैलीचा सुयोग्य वापर, पारंपरिक कीर्तन बाजाने केला आहे. जोडीला गायन आणि कथा, पात्रे एकत्र जात असल्याने नाटय़ मनोरंजक झाले आहे. सादरीकरणातील चाली जुनी मराठी नाटके आणि लोकसंगीतातून घेतल्या असून त्यामुळे 200 वर्षांपूर्वीचा भास निर्माण होतो. सादरीकरणाचा पोशाख विशेष आकर्षक आहे.
त्याच्या आत्मचित्रांवरून प्रत्यक्ष गंगारामचे पात्र प्रसाद काटदरे यांनी पडद्यावर साकार केले आहे. या घटनांमध्ये गंगाराम स्वत तालमीत, नदीकिनारी बसून, पार्वती टेकडीचे चित्र, किडय़ाचे चित्र करतो आहे असा सिनेमॅटिक शॉट असल्याने अतिशय रंजक पद्धतीने इतिहासाची पाने सहज उलगडली जातात. कला इतिहास अशा सोप्या पद्धतीने सांगता येईल याचा ‘इंजिनस नेटिव्ह ः कथा एका मुरक्क्याची’ हा वस्तुपाठ आहे. ‘इंजिनस नेटिव्ह ः कथा एका मुरक्क्याची’ यामधील ‘मुरक्का’ शब्दाचा अर्थ अल्बम असा आहे. चित्कार जेम्स वेल्स याला 1790 च्या सुमारास इंग्रजांचा वकील सर चार्ल्स म्यालिटी याने पुण्यात बोलावले आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली चित्रशाळा पुण्यात सुरू झाली. चार्ल्स जेव्हा मायदेशी जायला निघाला तेव्हा त्याला भेट म्हणून गंगारामच्या चित्रांचा संग्रह पेशव्यांनी दिला. तो त्याने जपला आणि पुढील पिढीला तो येल संग्रहालयाला दिला. असे कथानक पुढे जाते आणि हा भेट दिलेले संग्रह म्हणजे मुरक्का होय. या अल्बमची, त्याच्या काल नोंदण्याच्या चित्रांची ही कथा आहे.
नितीन हडप व मकरंद सप्रे या दोघांनी चित्रकाराबद्दल असलेली माहिती अनेक संदर्भांमधून गोळा केली. त्याचे नाटय़ांतर करून संपूर्ण कार्यक्रमाची आखणी आणि मांडणी केली आहे. एकूणातच सशक्त अनुभव देणारा असा हा प्रयोग असून हे चित्रकाम सर्वदूरपर्यंत पोहोचावे यासाठी हा डॉक्युड्रामा महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.
(लेखक चित्रकार असून कला क्षेत्रात कार्यरत आहेत.)
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)
























































