
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकात जे काही असेल ते सर्व ओरीजनल असेल. ‘एआय’चा अजिबात वापर करू नका. नव्या पिढीला प्रेरणा आणि मराठी माणसाचा स्वाभिमान उंचावेल असे स्मारक घडले पाहिजे, अशा स्पष्ट सूचना स्मारक समितीचे अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिल्या.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची सोमवारी महत्त्वाची बैठक स्मारकस्थळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. 23 जानेवारी 2027 पूर्वी स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून कामाला गती देण्यात आली आहे. स्मारकामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे ठरले असले तरी त्यात आणखी काय नवीन समाविष्ट केले जाईल यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
या बैठकीला स्मारकाचे सचिव, शिवसेना नेते सुभाष देसाई, स्मारकाचे सदस्य शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त संजय मुखर्जी, स्मारकाचे सदस्य पराग अळवणी, शिशिर शिंदे, आर्किटेक्ट आभा लांबा आदी उपस्थित होते. स्मारकाच्या दुसऱया टप्प्यात कोणकोणती कामे होणार आहेत त्यासंदर्भात सादरीकरण यावेळी केले गेले.
देशभरातील नियतकालिकांमधील बातम्या, पह्टो मिळवा शिवसेनाप्रमुखांचे कार्य नव्या पिढीला समजावे आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी याकडे विशेष लक्ष द्या असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बाळासाहेबांची भाषणे, चित्रे, छायाचित्रे, व्यंगचित्रे, लेख, वस्तू आदींचा समावेश स्मारकामध्ये असणार आहे. त्यासाठी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देशाच्या प्रत्येक राज्यामधील दैनिके आणि नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध बाळासाहेबांच्या बातम्या, पह्टो व अन्य साहित्यही मिळवण्याचे प्रयत्न करावेत!































































