केरळच्या प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने उचलले टोकाचे पाऊल; अवघ्या 24 व्या वर्षी संपवले जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळच्या कासारगोड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आपल्या राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपवली. रेश्मा (24) असे या तरूणीचे नाव आहे. सोशल मीडियावर ‘चिन्नू पापू’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या रेश्माचे इन्स्टाग्रामवर सुमारे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. चूरी येथील तिच्या भाड्याच्या घरात ती मृतावस्थेत आढळली. दुपारी 2 च्या सुमारास घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रेश्माच्या आत्महत्येमागे वैयक्तिक आयुष्यातील तणाव असल्याचे समोर येत आहे. रेश्माचा प्रेमविवाह झाला होता, मात्र अवघ्या एक महिन्यापूर्वीच तिचा घटस्फोट झाला. या विवाहातून तिला चार वर्षांचे एक बाळ असून, घटस्फोटामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. तिच्या निधनानंतर आता या बालकाचा सांभाळ तिचे आई-वडील करत आहेत. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रेश्मा ही तिच्या शांत स्वभावासाठी आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेसाठी ओळखली जात असे. घटस्फोटानंतर तिने स्वतःला कामात झोकून दिले होते. सोशल मीडियावर ती ‘चिन्नू पापू’ या नावाने अत्यंत लोकप्रिय होती. तिचे व्हिडिओ प्रामुख्याने ग्रामीण जीवन, केरळची संस्कृती, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि कासारगोडमधील पर्यटन स्थळांवर आधारित असायचे. विशेषतः तिचे तमिळ भाषेतील संवाद आणि साधेपणा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता.

अधूरची रहिवासी असलेल्या या तरुण इन्फ्लुएन्सरच्या अचानक जाण्याने सोशल मीडिया विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तिने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.