
हिंदुस्थान आता अ गटात दुसऱया स्थानावर आहे. गतविजेता हिंदुस्थान दुबळ्या नामिबियाविरुद्ध मैदानात उतरणार असून या लढतीत केवळ विजयच मिळवायचे नाही तर मोठा विजय नोंदवत गटाचे अव्वल स्थानाचे तख्तही जिंकण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. अमेरिकेविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागल्याने नामिबियाविरुद्ध कोणताही धोका न पत्करला विजयावर शिक्कामोर्तब करण्याची रणनीती सूर्या अॅण्ड कंपनीने आखली आहे. जेटली मैदानावर त्याची अंमलबजावणी होईल, असा विश्वास हिंदुस्थानी संघाला आहे.
अमेरिकेविरुद्ध 6 बाद 77 अशा बिकट परिस्थितीतून कर्णधार सूर्यकुमार यादवने संघाला सावरले होते. त्याच्या खेळीने हिंदुस्थानच्या आव्हानात जान ओतली होती, अन्यथा मुंबईवर अमेरिकेचे स्टार्स अॅण्ड स्ट्राइप्स फडकले असते. अमेरिकेविरुद्ध हिंदुस्थानची फलंदाजी पुरती ढेपाळली होती. मग तो अभिषेक शर्मा असो किंवा इशान किशन. तिलक वर्मानेही निराश केले होते. त्यातच गोल्डन डकवर बाद झालेला अभिषेक दोन दिवसांनंतर रुग्णालयातून बाहेर पडलाय. त्याची पोटदुखी संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. नामिबियाविरुद्ध त्याच्याशिवाय उतरावे लागले तर त्याची जागा पुन्हा संजू सॅमसनला द्यावी लागू शकते, मात्र अभिषेकबद्दलचा निर्णय गुरुवारी दुपारीच घेतला जाईल.
फलंदाजांनी साथ दिली नसली तरी गोलंदाजांनी साथ सोडली नाही. मोहम्मद सिराजने सुरुवातीला आक्रमक मारा करत दबाव निर्माण केला. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी मधल्या षटकांत धावांवर लगाम घालत प्रतिस्पर्ध्याची काsंडी केली. आता नामिबियाविरुद्ध जसप्रीत बुमरा मैदानात उतरेल. त्यामुळे अर्शदीप बाहेर असेल की सिराज ते संघव्यवस्थापन ठरवेलच. तसेच कुलदीप यादवही संघात स्थान मिळवण्याच्या धडपडीत दिसतोय. तो आला तर वरुण चक्रवर्तीला विश्रांती मिळेल.
हिंदुस्थानचा विजय निश्चित मानला जात असेल तरी नामिबिया मात्र सहज हार मानणारा संघ राहिलेला नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या पराभवाने त्यांच्या कमतरता उघड केल्या, पण लढण्याची वृत्तीही दाखवली. निकोल लॉफ्टी-ईटन आणि जान फ्रायलिंक यांनी आघाडीच्या फळीत स्थैर्य दाखवले, मात्र मधली फळी वेग वाढवताना ढासळली. हिंदुस्थानविरुद्ध त्यांना सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, स्ट्राइक फिरवावी लागेल आणि भक्कम भागीदारी उभी करावी लागेल. त्यांच्या गोलंदाजांसाठी हिंदुस्थानची फलंदाजी मोठी परीक्षा असेल. दिल्लीची खेळपट्टी फलंदाजांना साथ देईल, असे बोलले जात असले तरी या वेगवान खेळात कधीही काहीही घडू शकते. याची जाणीव सर्व संघाला पहिल्या पाच दिवसांतच झालीय.
































































