
भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलमध्ये 120 पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती अंतर्गत सीनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी-टेलिकॉम स्ट्रीमच्या 95 आणि सीनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स स्ट्रीमच्या 25 अशा एकूण 120 जागांसाठी भरती केली जात आहे. या दोन्ही पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च असून 29 मार्चला परीक्षा होणार आहे.
अमरनाथ मंदिराच्या विकासासाठी 180 कोटी
जम्मू आणि कश्मीरमधील प्रसिद्ध अमरनाथ मंदिराच्या विकासासाठी 180 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, अशी माहिती जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बजेट सादर केल्यानंतर दिली. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी बजेट सादर केले. अमरनाथ यात्रा दरवर्षी जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला सुरू होते. जवळपास 40 ते 50 दिवसांच्या या काळात दरवर्षी 3 ते 5 लाखांहून अधिक लोक बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी येतात.
उदयपूर–अहमदाबाद मार्गावर धावणार ‘वंदे भारत’
राजस्थान आणि गुजरातदरम्यान एका नवीन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ही नवीन रेल्वे उदयपूर सिटी आणि असारवा (अहमदाबाद) दरम्यान धावणार आहे. सेमी हाय स्पीड ट्रेन आठवडय़ातील सहा दिवस धावणार आहे. उदयपूरहून असारवासाठी ट्रेन सकाळी 6.10 वाजता रवाना होईल. ही ट्रेन सकाळी 10.25 वाजता असारवा पोहोचेल. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर ‘वंदे भारत’च्या दोन ट्रेन बंद करण्यात येणार आहेत. उदयपूर-आग्रा वंदे भारत एक्सप्रेस 15 फेब्रुवारीपासून तर उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्सप्रेस 14 फेब्रुवारीपासून बंद केली जाईल.
नेपाळमध्ये बस नदीत कोसळली; 12 ठार
नेपाळमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. ही बस तमाकोशी नदीत कोसळली. यामध्ये 12 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 8 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 7 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी काठमांडूला पाठवण्यात आले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस थेट 100 मीटर खोल नदीत कोसळली.
पाकिस्तान 20 हजार अफगाणिस्तानींना काढणार
पाकिस्तान 20 हजार अफगाणिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढणार आहे. पाकिस्तानी सरकारने प्रांतीय प्रशासन आणि पोलिसांना यासंबंधी निर्देश दिले आहेत. इस्लामाबाद, बलुचिस्तान, पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा यांसह अन्य काही भागात राहात असलेले आश्रित लोकांना देशाबाहेर काढणार आहे. यामध्ये सर्वाधिक आश्रित हे 2021 मध्ये तालिबानमधून आलेले आहेत.






























































