
>> प्रा. आशुतोष पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन व उत्तरकालीन चित्रांचा अभ्यास करताना नुकतेच माझ्या संशोधनात ‘अश्वारूढ शिवराय’ या धाटणीचे नवीन चित्र समोर आले. इ.स. 1870 च्या दशकात जर्मनीमध्ये प्रकाशित झालेले हे चित्र ‘शिवस्वरूप’ समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ऐवज ठरणारे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्रोत मानून आज अवघा देश कार्यरत आहे. शिवाजी महाराजांबद्दल केवळ भारतीयांनीच नाही तर अगदी परकीय सत्तांनीदेखील अनेक अंगांनी लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करत असताना त्यांच्याबद्दल स्वकीय तसेच परकीयांनी काढलेले उद्गार, पत्रांमध्ये त्यांच्याबद्दल आलेले उल्लेख आणि महत्त्वाचे म्हणजे महाराजांची विविध काळात काढलेली चित्रे शिवराय समजून घेण्यासाठी फार उपयुक्त ठरतात. शिवरायांची विविध चित्रे आज उपलब्ध आहेत. महाराजांच्या हयातीत व त्यांच्या पश्चातही अनेक चित्रे काढली गेली. ते प्रत्येक चित्र महत्त्वाचे आहे. प्रत्येक चित्रावर शिवरायांचे नाव होतेच असे नाही, पण परमानंद, सभासद, पराकालदास, थिवेनोट, हर्बर्ट डी यागार, एस्केलियोट, ओक्झीन्डेन अशा अनेक स्वकीय, परकीय प्रत्यक्षदर्शी लेखकांच्या लिखाणाच्या आधारावर ती चित्रे ओळखली गेली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना एस्केलियोट लिहितो, ‘मध्यम उंची आणि प्रमाणबद्ध शरीर. राजे कामात क्रियाशील, नजरेत तीक्ष्ण, भेदक आणि वर्णाने इतरांपेक्षा उजळ असून नेहमी स्मितहास्य करीत बोलतात. त्यांची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला असतो.’ थिवेनोट म्हणतो, ‘शिवाजीराजे उंचीला कमी, पिवळट तपकिरी रंगाचे होते. शिवाजीराजांचे डोळे अतिशय तेजस्वी आणि तीक्ष्ण असून, त्यामधून राजांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता जाणवते. राजे नेहमी दिवसातून एकदाच जेवण घेतात. त्यांचे आरोग्य चांगले आहे.’ असे अनेक महत्त्वाचे उल्लेख स्वकीय आणि परकीयांनी केलेले आहेत, हे उल्लेख आपल्याला महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन करून देतात. छत्रपती शिवाजी महाराजांची आजपर्यंत 25 हुन अधिक समकालीन व उत्तरकालीन चित्रे ज्ञात आहेत. या चित्रांचा अभ्यास करताना त्यांचे आलेले उल्लेख कामी येतात. त्यावरूनच ‘शिवस्वरूप’ समजून घेता येते.
या संदर्भात अभ्यास करताना नुकतेच मला ‘अश्वारूढ शिवराय’ या धाटणीचे एक नवीन चित्र शोधून काढण्यात यश मिळाले. हे चित्र इ.स. 1870 च्या दशकात जर्मनीमध्ये प्रकाशित झाले होते. आजपर्यंत हे चित्र अज्ञात होते व प्रथमच प्रकाशित होत आहे. हे चित्र निकोलाओ मनुची याच्या अल्बममधील ‘अश्वारूढ शिवराय’ या चित्राचा आधार घेऊन तयार करण्यात आले असावे. इ.स. 1870 च्या दशकात जर्मनी देशामध्ये एक मोठा ज्ञानकोश-सदृश ग्रंथ संच तयार होत होता. हा ज्ञानकोश लिपझिग आणि बर्लिन येथे कार्यरत असलेल्या फ्रान्झ ओट्टो स्पामर (1820-1886) यांच्या प्रकाशन संस्थेतून प्रकाशित झाला होता. त्यातील 1877 ला प्रकाशित झालेल्या खंडात एक महत्त्वाचे चित्र आहे आणि ते आहे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र.’ ‘िंast घ्ह्ग्a‘ या शीर्षकाअंतर्गत लिहीत असताना संपादकांनी केवळ 2-3 चित्रांचा समावेश केलाय त्यात एक तंजावरचे मंदिर, दुसरे मुघलांचे हरम आणि तिसरे चित्र शिवाजी महाराजांचे आहे. ज्याला 4386 असा चित्र क्रमांक दिलेला आहे. या खंडाच्या 1163 व्या पानावर हे चित्र आहे, ज्याखाली ‘प्ष्टल्ज्tत्ग्हा dाr श्aप्rattाह‘ म्हणजे ‘मराठय़ांचे प्रमुख’ असं लिहिलंय. या पानावर ईस्ट इंडिया या शीर्षकांतर्गत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ज्यात भारतातील धर्म, ब्रिटिश राज्य व त्याचा विस्तार, रेल्वे रूळ व त्यांचा विस्तार, नद्या, जंगल, विविध प्राणी, आदिवासी जमाती याबद्दल सविस्तर लिहिलेले आहे.
जर्मनीमध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथात भारताचे प्रतिनिधित्व म्हणून शिवाजी महाराजांचे चित्र प्रकाशित होते ही नक्कीच महत्त्वाची बाब आहे. या पानावर दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व म्हणून मंदिर, मध्य भारताचे शिवाजी महाराज आणि मुघलांचे प्रतिनिधित्व म्हणून हरम दाखवली आहे. यात परकीय लोकांमधे आपली असलेली प्रतिमा ही आपल्या लक्षात येते. हे चित्र आतापर्यंत प्रकाशात आलेले नव्हते. महाराजांच्या चित्रांसदर्भात संशोधनात्मक काम करताना हे अस्सल पान मिळाले आणि त्या पानाच्या मूळ स्थानाचा शोध घेत कळले की हे चित्र 1870 च्या दशकात प्रकाशित झाले होते. हे चित्र माझ्या वैयक्तिक संग्रहात आहे.
या चित्राचे निरीक्षण केल्यास लक्षात येते की, मनूची, लॅंग्लेस, झेवियर या तिघांनी प्रकाशित केलेल्या चित्राचा संदर्भ घेऊन हे चित्र तयार झाले असावे. चित्रात शिवरायांसह मोठं सैन्य दिसत नसलं तरी काही मुस्लिम पेहरावातील सैनिक हातात ढाल व तलवार घेऊन घोडय़ाच्या समोरच्या बाजूला उभे दिसतात. या चित्रात महाराजांचा घोडा सजवलेला असून तो चालतो आहे, असा दाखवलेले आहे, त्याच्या गळ्यात वाघनखेदेखील दिसतात. चित्रात शिवरायांनी डाव्या हाताने घोडय़ाचा लगाम पकडलेला असून उजव्या हातात दांडपट्टा आहे. शिवराय शाही पोशाखात असून, त्यांच्या छातीवर चंद्रकोर आहे व उजव्या बाजूच्या कमरेला कट्य़ार आहे. हे चित्र शिवोत्तर काळात चित्र बघून काढले गेल्याने व चित्रकाराला मराठा राज्याबद्दल फार माहिती नसल्याने शिवरायांचे शिरोभूषण हवे तेवढे अचूक रेखाटलेले नाही आणि ते अपेक्षितही आहे. पण चित्रकाराने केलेला हा प्रयत्न वाखाणण्याजोगा असून फारच परिश्रम घेऊन हे चित्र स्टील इंग्रेव्हिन्ग पद्धतीने प्रिंट केले आहे.
जर्मनीत प्रकाशित झालेल्या या चित्रामुळे शिवरायांची वैश्विकता अधिकच अधोरेखित होते. या नंतर शिवरायांचे अश्वारूढ चित्र प्रकाशित झाले ते इ.स. 1896 साली विलब्राहम इगरटन या इंग्रज लेखकाने लिहिलेल्या ‘Indian and oriental arms and armour‘ या पुस्तकात. अश्वारूढ प्रकारातील हे चित्र मनुची संग्रह आणि लॅंग्लेसच्या पुस्तकातून घेतल्याचे लेखकाने म्हटले आहे. हे महाराजांचे चित्र पॅरिसमधील मनुची संग्रहात असलेल्या चित्राची प्रतिकृती आहे. महाराजांच्या सुमारे 215 वर्षांनंतर हे चित्र तयार केले असून चित्रकाराला भारतीय पेहराव, शस्त्रs, अलंकार यांची फार माहिती नसावी. तसेच या पुस्तकात भारतात आढळणाऱया शस्त्रास्त्रांचा इतिहासही लिहिलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांच्या संशोधनात नवीन माहिती समोर येत आहे. शिवस्वरूप समजून घेताना ही चित्रे महत्त्वाचा ऐवज ठरतात.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)
























































