
>> मधुरा डांगे
आदिवासी समाजात होळीच्या उत्सवाला देवीस्वरूप मानत तशा प्रथांचा अंतर्भाव उत्सवात दिसतो. मातीशी घट्ट नातं असलेल्या आदिम समाजातील हा उत्सव निसर्गबदलाचं एक रूपक म्हणूनही साजरा होतो आणि तशा प्रतीकांची गुंफण होत होळीची पूजा प्रत्यक्ष सत्त्वाची पूजा म्हणून साजरी केली जाते.
अनागर संस्कृतीत होळीच्या उत्सवाला निसर्गाबदलाचं रूपक मानलं जातं. निसर्गबदलांना प्रथा, परंपरांना सामावून घेत मिथकांच्या रूपाने त्या सणउत्सवाला जोडल्या जातात. मातीशी, निसर्गाशी एकरूप होणाऱया आदिम समाजातील या परंपरांमध्ये होळी सणाला खास महत्त्व आहे. जनजाती परंपरेत होळीच्या उत्सवाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या उत्सवात निसर्गातील बदलाची जाणीव करून देणाऱया सर्व प्रतीकांची गुंफण उत्सवाच्या पर्वामध्ये दिसून येते.
आदिवासी समाजात होळी ही सर्वात मोठी देवी मानली जाते. होळीच्या उत्सवाची कथा अक्राणी, शहादा, तळोदा, शिरपूर इ. भागांत वेगवेगळी सांगितली जाते. त्यापैकी ही एक कथा. विदूबाई देवीने मातीपासून धरती, चांद, सूरज इत्यादी देवदेवता तयार केल्या. देवादिकांच्या मूर्ती तयार करत असताना तिने भांडे धुतले. त्या पाण्यात काही धूलिकण राहिले होते. ते उकिरडय़ावर टाकले. त्या धूलिकणांपासून एक मूल तयार झाले. काल्या व बुल्या देवराजे शिकार करण्यासाठी डोंगरात गेले. शिकार करीत असताना त्यांना तहान लागली. ते पाणी पिण्यास दर्याकाठावर गेले. तेथे उकिरडय़ात त्यांना एक मूल सापडले. त्याला उचलून घरी आणले व त्याचे नाव उली ठेवले. धूलिकणास उलीरायाची (धूलीराया) मुलगी म्हणून तिचे नाव ठेवले ‘उली’. हीच उली म्हणजे होळी. अग्नीला कवेत घेणारी, जमिनीवर तेजस्वितेने उभी असणारी होळी.
खान्देशातील भिल्ल आणि पावरांची होळी म्हणजे फक्त उत्सव नाही, तर प्रत्यक्ष सत्त्वाची पूजा मानली जाते. होळीची सुरुवात होते ती जंगलात होळीसाठी बांबू शोधायला जाण्यापासून. आपल्या जवळच्या जंगलातील सर्वात उंच बांबू आणला जातो. सगळे गावकरी मिळून जंगलात जातात. सर्वात उंच बांबू शोधून त्याची पूजा करतात आणि मग तो मुळासकट काढला जातो. एकदा बांबू काढला की, त्याला ‘जिवंत होळी’ मानले जाते. प्रत्येक लहानमोठय़ा गावात या जिवंत होळीची सत्त्व म्हणून पूजा केली जाते.
होळीच्या दिवशी पंचक्रोशीतील सगळे लोक एकत्र येऊन मध्यरात्रीच्या प्रहरी होलिका दहन करतात. याची तयारी त्या दिवशी सकाळपासूनच सुरू होते. गुलमोहराची फुले, आंब्याची पाने, उडदाचे मोठे पापड आणि शुभ्र वस्त्र यांनी होळीची सजावट होते. गावातील भगत होलिकादहनाच्या ठिकाणी जमिनीची पूजा करून त्यात होळीचा बांबू सन्मानपूर्वक रोवतो. मानता अर्थात नवस घेतलेली सगळी माणसे होळीभोवती फेर धरतात, पारंपरिक ढोल आदी वाद्यांचा गजर सुरू असतो. लहानमोठे सगळेच मैदानात जमून पारंपरिक नृत्य करतात आणि या सगळ्या वातावरणात मध्यरात्री होळी प्रज्वलित केली जाते.
जनजाती परंपरेत होळीच्या उत्सवाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पुढे येणाऱया वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणाऱया या उत्सवात निसर्गातील बदलाची जाणीव करून देणाऱया सर्व प्रतीकांची गुंफण उत्सवाच्या पर्वामध्ये दिसून येते.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण-उत्सवात प्रतीकात्मकता दिसते. आंब्याची पाने, गुलमोहराची फुले, उडदाचे पापड, श्वेत वस्त्र इत्यादी चिन्हे येणारा वसंत आणि उन्हाळा ऋतू यांची स्पष्ट चाहूल देतात.
लेखाच्या सुरुवातीला आलेल्या गोष्टीत धूलीरायाची कन्या म्हणून होळीचा उल्लेख येतो. हा धूलीराया म्हणजे आपली माती, जमीन, गाव जिथे धूळ अर्थात माती आहे. अशी आपल्या मातीतली आपली कन्या जणू माहेरी येते आहे अशी कल्पना होळीची असावी असे वाटते. ही कन्या आपली सोबत सत्त्व घेऊन येते असे मानतात. होलिका स्वतच्या रूपाला सगळ्यांच्या मनात विलीन होऊन सगळ्यांना कल्याणकारी असे सत्त्व म्हणजेच समृद्धी देऊन जाते. अशा मान्यता लोकोत्सवांना पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि सगळ्यांना एकत्रित आणणाऱया सामाजिक उत्सवाच्या रूपात पाहावयास मिळतात.
(लेखिका लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
























































