ऐकावे जनांचे…आयुष्याचं नेमकं गमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अक्षय मोटेगावकर

[email protected]

विषयांतील वैविध्य जपत निवेदनाच्या सहजसोप्या शैलीतून आवडीच्या विषयाचा छान समृद्ध करणारा अनुभव देणारे ‘अमुक तमुक’ हे मराठी पॉडकास्ट चॅनेल सध्याच्या घडीला लोकप्रिय ठरत आहे.

येत्या वर्ष दोन वर्षांत मी चाळिशीला शिवेन. सद्य समाज मान्यतेनुसार मध्यमवयात किंवा अगदीच आताच्या मराठीत सांगायचं तर मिडलाईफमध्ये मी प्रवेश करेन. याचाच अर्थ माझे तारुण्य आता ओसरले किंवा ओसरते आहे आणि मी आता म्हातारपणाकडे हळूहळू झुकणार. ‘अमुक तमुक’ या यूटय़ूब चॅनेलवरचा ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांच्या ‘खुसपूस’मधील मुलाखतीचा भाग जर मी पाहिला नसता तर हे वाक्य लिहितानासुद्धा म्हातारपणाबद्दलची माझ्या मनात एक सुप्त भीती तरळून गेली असती, पण तो भाग मी शांतपणे ऐकला, समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे वास्तव स्वीकारणे जरासे सुकर झाले. भीती अर्थातच खूप कमी झाली.

‘अमुक तमुक’ हे ओंकार जाधव आणि शार्दूल कदम या समाज माध्यमांमध्ये काम करणाऱया तरुणांनी सुरू केलेले हे चॅनेल. ओंकार हा ‘भाडिपा’ आणि ‘विषय खोल’ या दोन चॅनेल्सचा सहा वर्षे  क्रिएटिव्ह कन्टेन्ट हेड होता तसेच त्याने ‘द केरला स्टोरी’ या हिंदी चित्रपटासाठीदेखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. शार्दूलने ‘अमुक तमुक’ सुरू करण्यापूर्वी नऊ वर्षे ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन क्षेत्रात काम केले. चितळे, भाडिपा, क्रेड यांसारख्या कंपन्यांसाठी रिसर्च करून मार्केटिंग स्ट्रटेजी ठरविण्यास मदत केली.

‘अमुक तमुक’ हे नाव तसं पॉडकास्ट ऐकणाऱया मंडळींमध्ये परिचयाचेच. ‘अमुक तमुक’चे वेगवेगळे पॉडकास्टस् आहेत. ‘खुसपूस’, ‘नवा व्यापार’, ‘धनदौलत’, ‘कळीचा मुद्दा’, ‘अमुक तमुक’ शो आणि ‘बेसिक गोष्टी’. ‘अमुक तमुक’ शो हा बऱयापैकी स्थानिक ते जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी, मानसिक आणि शारीरिक आरोग्य, विवेकी पालकत्व, इतिहासातील कमी वाचली गेलेली पाने, मिथकांतील सौंदर्य आणि सणवार, मनोरंजन क्षेत्रातील अनुभव अशा विषयांवर आधारित आहे. साधारणत 150 दीडशेहून अधिक पॉडकास्टस्पैकी मला डॉ. जगदीश हिरेमठ यांचे ‘हाऊ टू अव्हॉईड हार्ट अटॅक’, भरत गोठोस्कर यांचे ‘द रीअल स्टोरी ऑफ मुंबई’, प्रणव गोखले यांचा दिवाळीवरील पॉडकास्ट, संतसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचा ‘जगद्गुरू तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान’, प्र. के. घाणेकर सरांसोबतचा ‘कोकणचा इतिहास’, अपूर्वा जोशी यांच्याबरोबरचा ‘ऑनलाइन फ्रॉडपासून स्वतची सुरक्षा कशी करावी’, मेधा भास्करन यांचा शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवरचा पॉडकास्ट हे आवडले.

चॅनेलचे काम आणि आवाका मोठा असल्याने आवडीच्या  विषयाचा छान समृद्ध करणारा अनुभव मिळतो हे नक्की. यामुळे आपल्या आचारविचारांमध्ये काही सकारात्मक बदल जरी घडले तरी आनंदाची गोष्ट आहे. हे सगळेच पॉडकास्ट आवडतील, सगळ्याच गोष्टी पटतील असं कधीच होत नसतं, किंबहुना तसं असूही नये. हे असं काही ऐकले, वाचले, पाहिले की, आपल्या मेंदूला चावी बसावी आणि त्यायोगे अभ्यास करण्याची, अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा बळावली जावी हाच उद्देश.

‘द अमुक तमुक शो’ मधील ‘धनदौलत’ आणि ‘नवा व्यापार’ हे पॉडकास्टस् मला विशेष आवडले. सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? काय काळजी घ्यावी? निवृत्ती वेतनाची सोय कशी करावी? वारसा हक्काने संपत्ती कशी मिळते? मुलांना पैशांची किंमत कशी शिकवावी? गृह कर्ज आणि कर्जाचा एकंदरीत सापळा कसा असतो? इत्यादीसारखे विषय त्यांनी ‘धनदौलत’मध्ये तर ‘नवा व्यापार’मध्ये नवीन उद्योग कसे उभारले जातात, त्यांच्या यश आणि अपयशाच्या कथा सांगितल्या जातात. पितांबरी, क्रेझी चीझी कॅफे, कालनिर्णय, चितळे बंधू व यांसारखे ब्रॅण्ड्स कसे  उभे राहिले? व्यवसायात अपयश का येऊ शकते? व्यवसायात पाय कोण खेचते? यांसारखे व व्यवसायाला उभं करण्यासाठी ‘सांगीन चार गोष्टी युक्तीच्या’ म्हणणारे पॉडकास्टस् ऐकायला मिळतील. हे सगळं यूटय़ूब, अॅमेझॉन, स्पोटिफायवर ऐकता येईल.

‘अमुक तमुक’च्या ‘खुसपूस’ पॉडकास्टमध्ये अत्यंत गरजेच्या, पण काही प्रमाणात दुर्लक्षिल्या गेलेल्या गोष्टींवर चर्चा होते. ‘अमुक तमुक’ची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या त्या विषयातील तज्ञ मंडळीच त्या विषयावर बोलतात. आपल्याला यापेक्षा अजून काय हवं?

(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)