
ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱया व अखेरच्या वन डे क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानवर 185 धावांनी विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादन केले. दीडशतकी खेळी करणारी कर्णधार एलिसा हिली या विजयाची मानकरी ठरली.
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 410 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा डाव 45.1 षटकांत 224 धावांवर संपुष्टात आला. यात स्नेह राणाने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. याचबरोबर जेमिमा रॉड्रिग्ज (42), प्रतिका रावल (27), कर्णधार हरमनप्रीत काwर (25) व दीप्ती शर्मा (29) यांनीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा थोडाफार प्रतिकार केला. या मालिकेत हिंदुस्थानच्या विजयाची पाटी कोरीच राहिली. ऑस्ट्रेलियाकडून अलाना किंगने 4, तर
जॉर्जिया वेअरहॅम हिने 2 फलंदाज बाद केले.
एलिसा, हिली यांची दणकेबाज शतके
त्याआधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजी देण्याचा टीम इंडियाचा निर्णय चांगलाच अंगलट आला. कर्णधार एलिसा हिली (158) अन् बेथ मूनी (नाबाद 106) यांच्या दणकेबाज शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 7 बाद 409 धावांचा डोंगर उभारला. एलिसा कारकीर्दीतील अखेरच्या वन डेत शतक ठोकणारी दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. तिने 98 चेंडूंमध्ये 27 चौकार व 2 षटकारांसह 158 धावांची तडाखेबंद खेळी करत तिने संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. यापूर्वी 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जोहमारी लॉटेगबर्ग हिने नेदरलँड्सविरुद्ध शतक साकारले होते. मुनीने 84 चेंडूंत 10 चौकार अन् एक षटकारासह आपली नाबाद शतकी खेळी सजविली. याचबरोबर जॉर्जिया वॉल (62) व निकोला केरी (नाबाद 34) यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. हिंदुस्थानकडून श्री चरणी व स्नेह राणा यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर रेणुका सिंग, काश्वी गौतम व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हिंदुस्थानी खेळाडूंचा हिलीला ‘गार्ड ऑफ ऑनर’
सामना सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थानी संघाने एलिसा हिलीला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत तिच्या कारकीर्दीचा सन्मान केला. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) महिला विभागाने सोशल मीडियावर या क्षणाचा पह्टो शेअर करत हिलीच्या योगदानाला सलाम केला.
जानेवारीत निवृत्तीची घोषणा
एलिसा हिलीने जानेवारी महिन्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याचे तिने सांगितले होते. तिसऱया सामन्यात सलामीला येत तिने वन डेमधील आठवे शतक पूर्ण केले.


























































