
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेली एलपीजी (LPG) सिलिंडरची टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारने बुकिंगच्या नियमांत पुन्हा एकदा मोठे बदल केले आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी आता सिलिंडर बुकिंगचा कालावधी २५ दिवसांवरून थेट ४५ दिवस करण्यात आला आहे. वाढत्या मागणीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.
आता नवीन सिलिंडरसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. यापूर्वी हा कालावधी २५ दिवसांचा होता. शहरांसाठी अद्याप कोणताही नवीन आदेश नाही. शहरांमध्ये २५ दिवसांचा नियम लागू राहील. जे ग्राहक १५-२० दिवसांतच सिलिंडर बुक करत होते, त्यांच्यावर या निर्णयामुळे मर्यादा येणार आहेत.
आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. गॅस संपण्याच्या अफवांमुळे अनेक ग्राहक ५५ दिवसांचा कोटा असतानाही अवघ्या १५ दिवसांतच बुकिंग करत असल्याचे समोर आले आहे. गरजेपेक्षा जास्त सिलिंडर भरून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे तुटवडा निर्माण होऊ नये, यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
























































