
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका हिंदुस्थानला बसत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत असल्याने पेट्रोलिय कंपन्या चर्चेत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (HPCL) गॅस प्लांटमध्ये घुसून अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरची गुरुवारी दुपारी गोळ्या झाडून हत्या केली. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना मूसाझाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंजनी येथील एचपीसीएल प्लांटमध्ये घडली. दुपारीच्या वेळी हल्लेखोर अचानक प्लांटमध्ये घुसले आणि त्यांनी थेट अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवर गोळ्यांच्या फैरी झाडल्या. गोळीबार इतका भीषण होता की, दोन्ही अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, भरदिवसा ही भयानक घटना घडल्यानंतर हल्लेखोर सहजपणे घटनास्थळावरून फरार झाले. या हल्यात सुधीर गुप्ता (मॅनेजर) आणि हर्षित मिश्रा (डेप्युटी मॅनेजर) यांची हत्या केली गेली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) यांच्यासह अनेक पोलीस ठाण्यांचा फौजफाटा तातडीने एचपीसीएल प्लांटमध्ये दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारे घुसून हत्या झाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
























































