राजाभाऊ देसाई स्मृती कबड्डी – पार्ले स्पोर्ट्स, वाघजाई, एसएसजी, ब्रम्हा उपांत्यपूर्व फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरू असलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेच्या तिसऱया दिवशी पार्ले स्पोर्ट्स अॅपॅडमी, गोल्फादेवी सेवा मंडळ, एसएसजी फाऊंडेशन, ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब, वाघजाई क्रीडा मंडळ, स्वस्तिक क्रीडा मंडळ यांनी उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले.

बाद फेरी अर्थातच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने सिद्धीप्रभा फाऊंडेशनचा 48-13 असा धुव्वा उडवत गटविजेतेपद पटकावत थेट
उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच  गुडमार्ंनग स्पोर्ट्स क्लबने लायन्स स्पोर्ट्स क्लबचा 45-32 असा फडशा पाडला. शार्दुल पाटीलने या सामन्यातही जोरदार चढायांचा खेळ सादर करत चक्क 23 गुणांची कमाई केली, तर लायन्सकडून राज आचार्यने चांगली लढत दिली. त्याचप्रमाणे ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने आपल्या दुसऱया सामन्यात अंकुर स्पोर्ट्सला 52-32 असे नामोहरम केले. प्रफुल झवरे, आकाश शिंदे यांच्या सुस्साट खेळासमोर अंकुरच्या संरक्षक आणि चढाईबहाद्दरांचे काहीएक चालले नाही. मध्यंतरालाच 31-18 अशी विजयी आघाडी घेत ब्रम्हाने अंकुरचा पराभव निश्चित केला होता. अंकुरकडून सुशांत साईलने काहीशी लढत दिली.

उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी स्वस्तिक क्रीडा मंडळाला जयभारतविरुद्ध खेळावे लागले. स्वस्तिकच्या अक्रम शेख, आकाश रुदाले, अशोक विटकर आणि प्रफुल चव्हाण यांच्या चढाई-पकडींच्या भन्नाट खेळाने जयभारतचा निभावच लागू दिला नाही. 37-23 अशा फरकाने स्वस्तिकने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी पार्ले स्पोर्ट्स
अॅपॅडमीशी झुंजावे लागणार आहे. गोल्फादेवीने नवोदित संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. गोल्फादेवीने धनंजय सरोज, सिद्धेश पिंगळेच्या खेळामुळे सामना सहज जिंकला.