
लोअर परळ येथील फिनिक्स पॅलेडियम मॉलमध्ये आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनात मराठी भाषेतील एकही पुस्तक ठेवण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. ‘बुकचोर’ पंपनीतर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आले असून त्याविरोधात मराठीप्रेमींच्या संतापाचा एकच भडका उडाला. याबाबत माहिती मिळताच आक्रमक शिवसैनिकांनी फिनिक्स मॉलवर धडक देत जाब विचारला. मराठी भाषा व संस्कृतीच्या सन्मानासाठी शिवसेना नेहमीच आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मराठीला जाणीवपूर्वक दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी आयोजकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक होत इंग्रजी व हिंदी भाषेतील फलक काढून टाकत मराठी भाषेला योग्य स्थान देण्याची ठाम मागणी केली. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना शाखा क्रमांक 198 च्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शाखाप्रमुख दीपक बागवे, युवासेना शाखाधिकारी नितीन शिरोडकर, उपशाखाप्रमुख शिवाजी कदम, शशिकांत नांदगावकर, मनोहर कदम, नगरसेविका अबोली खाडे यांच्यासह शिवसैनिक राजू वंजारे, राहुल गाला, संतोष अलचट्टी सहभागी झाले.




























































