
गोवा दाबोलीम एअरपोर्टवर अरुण एव्हिएशन पंपनीतील 58 सफाई कामगारांना तडकाफडकी काढण्यात आले होते. भारतीय कामगार सेनेच्या दणक्यामुळे व्यवस्थापन वठणीवर आले असून या कामगारांना पुन्हा नोकरीत सामावून घेतले आहे. त्यामुळे कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते-खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत व कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनानुसार, संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेऊन या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास भाग पाडले. सहचिटणीस नीलेश ठाणगे, विशाल पारकर यांनी लेबर कमिशनर गोवा, दाबोलीम एअरपोर्ट व्यवस्थापन, एअरपोर्ट अॅथॉरिटी तसेच अरुण एव्हिएशन पंपनीसोबत वारंवार पाठपुरावा केला होता. पंपनीने युनियन पदाधिकारी तसेच गोवा एअरपोर्ट अॅथॉरिटी यांची संयुक्त बैठक घेऊन या 58 कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यास व कायदेशीर सुट्टय़ा देण्याचे मान्य केले. तसे लेखी पत्रसुद्धा भारतीय कामगार सेनेला दिले.
या वेळी व्यवस्थापनाच्या वतीने गोवा एअरपोर्ट डायरेक्टर एल.टी. लक्षदीप, एअरपोर्ट अॅथॉरिटी जनरल मॅनेजर लक्ष्मी सुगनन, अरुण एव्हिएशनचे जनरल मॅनेजर रणजीव नंबियार आणि ऑपरेशन मॅनेजर श्रवण सिंग, युनियनच्या वतीने संजय कदम, नीलेश ठाणगे, कार्यकारिणी सदस्य विशाल पारकर, अॅड. संतोष पवार व संतोष पडाळे, थॉमस राऊत, मारुती शिरगावकर तसेच युनिट कमिटीचे किशोर चव्हाण, असीस लामनी, विशाल चव्हाण, सुरेश गौडगेरी हे उपस्थित होते.

























































