
>> रविप्रकाश कुलकर्णी
एखादी संस्था स्थापन करणे शक्य असते, पण विपरीत परिस्थितीत सापडलेली संस्था मूळ स्थितीत म्हणण्यापेक्षा ऊर्जिता अवस्थेत आणणे म्हणजे महाकर्म कठीण गोष्ट असते. अशक्य वाटणारी किमयाच म्हणायची ती, पण अशा गोष्टीदेखील घडतात. त्याचं कारण केवळ सेवाभावी वृत्तीने नव्हे तर तन, मन, धनाने समर्पित झालेल्याने केवळ हाच ध्यास घेतला तरच हे घडू शकते. अशी दुर्मिळ उदाहरणे समाजापुढे वेळीच येणं आवश्यक असतं. अशा व्यक्तीचे, त्यांच्या संस्थेचे गुणगौरव होतात. समाजाने दिलेली ती पोचपावती असते. हे होण्यासाठी त्या व्यक्तीने व्यक्तिगत आयुष्य कसे बाजूला ठेवले हे क्वचितच कळतं. त्यांचं हे कार्य, आदर्श, इतिहास नुसता सांगो वांगी न राहता ग्रंथबद्ध व्हावा या कल्पनेने कुणीतरी पुढाकार घेऊन ते कष्टप्रद काम करायला लागते.
वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेचा बोलबाला सर्वदूर तर केव्हाच पोहोचला आहे. त्याची कळसाध्यायाची पोचपावती म्हणजे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वत या संस्थेला भेट देऊन म्हटलं आहे की, निसर्गाने केलेल्या अन्यायावर, त्यावर मात करून अशा व्यक्तींमध्ये जीवन इच्छा प्रबळ करून एक नवे परिपूर्ण आयुष्य जगण्याची जिद्द निर्माण करणाऱया संस्थेला धन्यवाद आणि शुभेच्छा!अर्थात हे सगळं श्रेय संस्थेला विपरीत परिस्थितीतून केवळ सुस्थितीत नव्हे तर वर्धिष्णु वाटचालीकडे नेणाऱया मुरलीधर कचरे यांच्या नेतृत्वाकडे जाते. त्यांची ही सेवाभावी कहाणी `विश्वस्त’ या पुस्तकात रवींद्र गोळे यांनी सांगितलेली असून साप्ताहिक `विवेक’ (हिंदुस्थान प्रकाशन संस्था) यांनी ती प्रकाशित केली आहे.
सदर पुस्तकाला प्रदीप दादा रावत यांची प्रस्तावना असून त्यात म्हटल्याप्रमाणे, म्हटले तर हे पुस्तक मुरलीधर कचरे नावाच्या सेवा साधकाचे चरित्र आहे किंवा या पुस्तकातून अपंग कल्याणकारी संस्थेच्या जडणघडणीचा प्रवास मांडला आहे. मुरलीधर कचरे गेली तीन तपे अपंगांसाठी काम करत असून राष्ट्रीय पातळीवर या कामाची नोंद घेतली गेली आहे. नि:स्वार्थी भावनेने मुरलीधर कचरे यांनी केलेले काम आज दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक ठरले आहे. पण हे सांगताना त्यामागची प्रेरणा आणि मार्गदर्शन काय आहे ते सांगतात, `संघ संस्कार, कार्यनिष्ठा आणि दूरदृष्टी या तिन्ही गोष्टींचा संगम या पुस्तकात अनुभवता येतो.’ याच जीवननिष्ठेतून कचरे यांनी अपंगांना मदत करणे हे आपले जीवनध्येय करून टाकले. संस्थेच्या माध्यमातून अपंगांचे कल्याण साधण्यासाठी ते अविरत झटले. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे दिव्यांग मुलामुलींना त्यांनी आत्मविश्वास दिला. मुलींना आत्मसन्मान मिळवून दिला. त्यांच्या जीवनात सगळ्या दृष्टीने सक्षम केले. जी मुले-मुली मदतीच्या अभावी परावलंबी जीवन जगण्याची भीती होती, त्याला त्यांच्या जीवनात अनुकूल बदल घडवायला शिकवले. त्यांना विविध कौशल्ये शिकवली. त्यांना स्वावलंबी बनवले. ही कामगिरी इतकी दृश्य परिणामकारक आहे की, ज्यांना जीवनात प्रेरणा हवी असेल, त्यांनी या दिव्यांगांच्या संस्थेला निश्चित भेट द्यावी. कौशल्याने विकास कसा साधता येतो हे तिथे अनुभवता येईल. रावत यांनी म्हटल्याप्रमाणे, `यासाठी निधी उभारण्यासाठी कचरे यांनी भारतभर माणसे जोडली. आज ही संस्था म्हणजे जणू द्रौपदीची थाळी आहे. ते अक्षय पात्र आहे. इथे सगळ्या गरजा पूर्ण होतात.’
सामान्य माणूस अथक स्वकर्तृत्वाने असामान्य कर्तृत्व गाजवू शकतो याचे हे उदाहरण आहे. त्यामुळेच दिव्यांग क्षेत्राबाबत मुरलीधर कचरे यांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असे वाटणे इतकी वाटचाल त्यांनी करून दाखवलेली आहे.
मुळात ही संस्था 1956 मध्ये भारत सेवक समाजाचे कार्यकर्ते डॉ. आर. जी. काकडे यांनी स्थापन केली, पण विविध कारणाने ही संस्था मोडकळीस आली. या वळणावर कचरे यांनी संस्थेचे सुकाणू आपल्या ताब्यात घेतले आणि कायापालट करून दाखवला. हे साध्य कसे केले म्हणजेच या पुस्तकाचा गाभा आहे. मग त्यात त्या काळाचे प्रतिबिंब, आणीबाणी काळ, प्रचारक म्हणून आलेले अनुभव, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्यासोबत केलेले काम, बाबरी मशीद प्रकरण, स्वतचा संसार, अशी वाटचाल करत कचरे यांनी दिव्यांगांसाठी केवळ नावाची सक्षम संस्था असे न करता सर्वार्थाने ते खरे करून दाखवले. संस्थेला आयएसओ मानांकन मिळवून दाखवले. आज ही संस्था म्हणजे सामाजिक तीर्थस्थळ एवढी प्रतिष्ठा संस्थेला लाभली आहे.
एरवी केलेल्या कामाचा गवगवा करायचा नाही हे सूत्र संघ कार्याच्या बाबतीत दिसते. त्याप्रमाणेच मुरलीधर कचरे यांचे कार्य आहे. ते अकथीतीतच राहिले असते, पण ही उणीव रवींद्र गोळे यांच्या `विश्वस्त’ पुस्तकाने भरून काढली आहे.

























































