
>> आशीष यावले
रंगरेषांतून चित्रकाराचे भावविश्व, संवेदनशीलता आणि सृजनशीलता प्रकट करणाऱया शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूरचे 59 वे वार्षिक कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रंगरेषांच्या या उत्सवाविषयी…
चित्रकला ही मानवी भावना आणि विचार व्यक्त करणारी प्रभावी कला आहे. चित्रकार या कलेच्या माध्यमातून आपल्या कलाकृतीत दैनंदिन जीवनातील विविध विषय, परंपरा आणि सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीचे सूक्ष्म प्रतिबिंब उमटवत असतो. त्या उत्स्फूर्त आणि आंतरिक आवेगातून कॅनव्हॉसवर उमटणारे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर यांचे 59 वे वार्षिक कला प्रदर्शन पार पडत आहे. रंगरेषांचा हा कलोत्सव 18 मार्चपर्यंत बघता येईल. या प्रदर्शनात रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला आणि कलाशिक्षक व प्रशिक्षण या विभागातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत.
आदिवासी समाजात सण-उत्सव व आनंदाच्या प्रसंगी ‘तारपा’ हे वाद्य वाजवण्याची परंपरा आहे. बांबू, गोणी, कापड आणि टाकाऊ वस्तूंपासून साकारलेली ‘तारपा’ची प्रतिकृती महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर साकारली आहे. 15 फूट उंच अशी ही प्रतिकृती ‘इमल्शन’ रंग प्रकारातील असून सजावटीसाठी वाद्यावर वारली पेंटिंग व निसर्गचित्रे चितारली आहेत. ‘स्त्राr’त्वाची वेगवेगळी रूपे साकारताना अनेकदा मन आणि शरीर एकमेकांपासून वेगळे झाल्याची भावना ‘स्त्राr’च्या मनात निर्माण होते. तिच्या अंतकरणातील द्वंद्वाला धरती कावरे या विद्यार्थिनीने कलाकृतीतून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रात आवश्यक घटकांची रचना करताना जाळीच्या चौकटीत बंधिस्त ‘स्त्राr’ दाखवली आहे.
जागतिकीकरणाच्या या युगात पाश्चात्य भाषेच्या तुलनेत ‘मराठी’चा वापर हळूहळू कमी होताना दिसतो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केवळ शासनच नव्हे, तर प्रत्येक मराठी भाषिकाने प्रयत्न करण्याची जबाबदारी आहे. या आशयाचा संदेश देणारी कलाकृती अनुराग मानकर या विद्यार्थ्याने साकारली आहे.
जाहिरातीतील शब्दांसह ‘चित्रांकन’ हादेखील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शाब्दिक विचारांपेक्षा चित्राद्वारे होणारे विचारप्रसारण अधिक जलद व प्रभावी होते. ईशा पौनीकर या विद्यार्थिनीने अतिशय कल्पकतेने डिझाईन केलेले ‘मोबाईल अॅडिक्शन’ हे जाहिरात कॅम्पेन समकालीन सामाजिक समस्येकडे लक्ष वेधते. समाजप्रबोधन करणाऱया या जाहिरात कॅम्पेनमधील रंगसंगती, आकाररचना, संतुलन, अवकाशविभाजन, दृश्य संप्रेषण या सर्व तांत्रिक बाबी परिपूर्ण आहेत.
रणजीत वानखेडे या विद्यार्थ्याने स्त्राrभ्रूण हत्येविरोधात प्रतीकात्मक आणि प्रभावी दृश्यभाषेच्या माध्यमातून भाष्य केले आहे. काळा, राखाडी आणि लाल या मर्यादित रंगांचा वापर व विषयाला अनुरूप कॅलिग्राफी साकारल्यामुळे चित्रकाराच्या संदेशातील वेदना आणि तीव्रता प्रभावीपणे पुढे आल्या आहेत. स्वतच्या आणि इतरांच्या जिवाची किंमत ओळखा व रोड सेफ्टीचे नियम पाळा अर्थातच ‘या फ्रेमचा भाग बनू नका’ असा अतिशय समर्पक शब्दात हा संदेश तेजस्विनी भोगे या विद्यार्थिनीने आपल्या कॅम्पेनच्या माध्यमातून पोहोचविला आहे. संपूर्ण कॅम्पेनची मध्यवर्ती रचना करून त्यातील तिरपी ठेवलेली फोटोफ्रेम प्रथमदर्शनी लक्ष वेधून घेते. मर्यादित पण अर्थपूर्ण रंगसंगती, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल लाईट्स, लेन, स्पिडमीटर या प्रतीकांचा प्रभावी वापर केला आहे. चाक आणि अस्तित्व या शिल्पात शिवम कुंभार या विद्यार्थ्याने विटांच्या मातीचा वापर करून कलाकाराने स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचे चेहरे एका स्तंभाप्रमाणे साकारले आहेत, जे पिढय़ान्पिढय़ांचा संघर्ष आणि एकमेकांना दिलेला आधार अधोरेखित करतात.
या विभागातील विद्यार्थ्यांची चित्र रेखाटनातील सहजता, कलात्मक रचना, विषयानुरूप प्रतिमा, कुतुहूल आणि जिज्ञासा वाढविणारे वेगवेगळे आकार, पृष्ठभागांचा पोत आणि रंगांचे संतुलित विभाजन यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेले आकृतिबंध खिळवून ठेवतात. श्रावणी सहारे या विद्यार्थिनीने ‘फंक्शनल डिझाईन’ प्रकारात ‘गालीचा’चे सुरेख डिझाईन साकारले. भूतलावर कुणीतरी ‘देवदूत’ रूपात अवतरेल या आध्यात्मिक आणि आधुनिक विचारांचा सुरेख मेळ साहिल मोहुर्लेने आपल्या कलाकृतीतून साधला आहे. अश्विनी जयस्वाल या विद्यार्थिनीने ‘पोस्टर कलर’च्या माध्यमातून लोखंडी साखळ्यांच्या गुंत्यात अडकलेले कुलूप आणि किल्ल्या मानवी जीवनातील बंधनाचे प्रतीक म्हणून दाखविले आहे.
चित्रकार हा केवळ रंग, रेषा आणि आकारांची मांडणी करीत नाही, तर त्याच्या अंतर्मनातील भावना, संवेदना, विचार, अनुभव आणि नवनवीन कल्पनांना दृश्यरूप देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे चित्रकलेकडे शुद्ध व्यासंग म्हणून पाहण्याची गरज आहे.
(लेखक उपयोजित कलेचे अभ्यासक आहेत.)

























































