
गिरगाव येथे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सुरांची मैफील रंगणार आहे. सामाजिक-सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार मानकरी लोकप्रिय गायक राहुल देशपांडे व राज्य पुरस्कार मानकरी सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या आवाजातील मराठी व हिंदी गीतांची सुरम्य संध्याकाळ रंगणार आहे.
प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक तथा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायक राहुल देशपांडे व गायिका प्रियांका बर्वे या दोन्ही कलाकारांच्या सुरेल गायनामुळे रसिकांना अविस्मरणीय संगीतसंध्येचा अनुभव मिळणार आहे. 18 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर, प्रबोधन क्रीडा भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून या सुरेल संध्याकाळचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रबोधन गोरेगावचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी केले आहे.































































