
हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. रस्त्यांवर सर्वत्र बर्फ साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून अटल बोगद्यात 1000 हून अधिक वाहने अडकली होती. अडकेलल्या वाहनांची माहिती मिळताच मनाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर अडकलेली वाहने मनालीकडे वळवण्यात येत आहेत.
शनिवारपासून मनाली आणि परिसरात अचानक बर्फवृष्टी सुरू झाली. बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची वाहने बर्फावरून घसरली. विविध ठिकाणी मनाली पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. अचानक झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे अटल बोगद्याच्या दक्षिण पोर्टलजवळ एक हजाराहून अधिक वाहने बर्फात अडकल्याचे मनालीचे डीएसपी केडी शर्मा यांनी सांगितले. घटनास्थळी मनाली पोलीस आणि बचाव पथक तैनात असून बचाव कार्य सुरू करण्यात आले. सर्व पर्यटकांना सुरक्षितस्थळी हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्यावरील बर्फ हटवण्याचे कामदेखील सुरू आहे.



























































