
आखातातील युद्धाचे परिणाम जागतिक स्तरावर दिसू लागले असून हिंदुस्थानलाही याचा मोठा फटका बसला आहे. सध्या देशात एलपीजी गॅस सिलिंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. लोक अक्षरश: दिवसदिवसभर गॅस सिलिंडरसाठी वणवण करत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण यामुळे त्रस्त आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार यालाही या संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अक्षयने या समस्येवर भाष्य केले.
मुंबई महापालिकेच्या (BMC) ‘मुंबई क्लीन लीग’ कार्यक्रमात अक्षय कुमार सहभागी झाला होता. यावेळी त्याला देशातील गॅस टंचाईबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्याने त्याला येणाऱ्या अडचणींबाबत भाष्य केले. अक्षय म्हणाला की, “माझ्या घरातही गॅसची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे परिस्थितीवर मात करण्यासाठी माझ्या पत्नीने (ट्विंकल खन्ना) आताच दोन ‘इंडक्शन शेगड्या’ ऑर्डर केल्या आहेत.
याच कार्यक्रमात अक्षयला संजय दत्त आणि नोरा फतेही यांच्या ‘सरके चुनर’ गाण्यावरील अश्लीलतेच्या आरोपांबाबतही विचारण्यात आले. यावर उत्तर देताना अक्षयने अत्यंत चतुराईने महापालिकेच्या मोहिमेचा संदर्भ दिला. तो म्हणाला, “हा बीएमसीशी संबंधित प्रश्न नाही. बॉलिवूडमधील ‘कचरा’ साफ करणे हे महापालिकेचे काम असते तर, मी त्यांना नक्कीच विनंती केली असती की त्यांनी तिथेही स्वच्छता करावी.” त्याच्या या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
अक्षयचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
अक्षय कुमार लवकरच ‘भूत बंगला’ या चित्रपटात झळकणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपट असून, तो 10 एप्रिल 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात परेश रावल आणि राजपाल यादव यांच्यासारखी दिग्गज स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हेरा फेरी 3’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांमधूनही अक्षय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.





























































