आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंबा व काजू हे कोकणची ओळख आहे. कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आंबा व काजू फळ पिकाचा मोहर गळून पडल्यामुळे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱयांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबा व काजू प्रश्नाबाबत आयोजित बैठकीत स्पष्ट केले.

पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होणार

महावितरण  कंपनीने केलेल्या  विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत विजेचे दर वाढण्याऐवजी दरवर्षी 1.2 टक्क्यांनी कमी होतील. तसेच 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने सौर ऊर्जेचा लाभ कमी केल्यामुळे ग्राहकांच्या वीज देयकात वाढ झाल्याबाबत अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांनी प्रश्न विचारला होता.

सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीला कर्जमाफी

सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीग्रस्त शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. तसेच अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने जळगावसह काही भागांमध्ये कर्जवसुलीला स्थगिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला.