
नाशिक जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस गारपिटीसह वादळी वारा व अवकाळीने कहर केला. यामुळे नऊ तालुक्यांत काढणीला आलेल्या कांद्यासह रब्बीची पिके, द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. सुमारे 10 हजार 622 शेतकऱ्यांच्या सात हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांची हानी झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. खरिपानंतर आता रब्बीची उभी पिके डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडले आहेत.
देवळा तालुक्याच्या पूर्व भागाला गुरुवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. दहिवड परिसरात गारपिटीसह पावसाने डाळिंबाचे नुकसान केले, काढणीला आलेले कांदा, गहू, मका पीक जमीनदोस्त केले. उमराणे परिसरातही थैमान घातले. कांदा बियाणे तयार करण्यासाठी लावलेले टोंगळे खराब झाल्याने मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.
द्राक्ष, डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान
मालेगाव, सटाणा, नांदगाव, निफाड, सिन्नर, देवळ्यात वादळी वाऱयासह अवकाळीने डाळिंबांची मोठी हानी झाली. हे क्षेत्र सुमारे 1 हजार 377 हेक्टर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. छोटी फळे वादळी वाऱयामुळे गळून पडली. झाडांनाही गारांचा मोठा मारा बसला. निफाड, सिन्नर व दिंडोरी भागांतील परिपक्व द्राक्षावरही हे अस्मानी संकट कोसळले. अनेक ठिकाणी गारांच्या फटक्याने पानेही झडून गेली. घडांवर बुरशी पसरणे, मणी गळणे, तडे जाणे अशा प्रकारांमुळे द्राक्ष उत्पादकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे.
गहू, हरभऱ्यासह फळबागांना तडाखा
पुणे –राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे व काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे मागील दोन ते तीन दिवसांत रब्बी हंगामातील काढणीच्या अवस्थेतील गहू आणि हरभरा पिकांना मोठा तडाखा बसला आहे. याशिवाय कांदा, भाजीपाला, फूलपिके आणि द्राक्ष, केळी या फळबागा मिळून एकूण 51 हजार 488 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक 11 हजार 650 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान अहिल्यानगर जिह्यामध्ये झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करा
अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे, फळबागांचे तसेच काढणीस आलेल्या पिकांचेही नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आणि योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली .


























































