
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक आयोगाने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱयांच्या घाऊक बदल्या केल्या आहेत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर केलेल्या या बदल्यांमुळे नवे राजकीय युद्ध पेटले आहे. बदल्यांच्या निर्णयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली. त्यापाठोपाठ तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला कोलकाता उच्च न्यायालयात खेचले आहे.
एकाचवेळी मोठय़ा प्रमाणावर उच्चपदस्थ अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला विचारात न घेताच मनमानी आदेश जारी केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. कल्याण बॅनर्जी यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना प्रतिवादी बनवले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा 15 मार्चला करण्यात आली. त्या घोषणेनंतर लगेचच 50 हून अधिक उच्चपदस्थ अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महासंचालक आणि कोलकाता पोलीस आयुक्त अशा बडय़ा अधिकाऱयांचा समावेश आहे. अनेक अधिकाऱयांना निवडणूक कामासाठी परराज्यात पाठवले आहे. बदली केलेल्या अधिकाऱयांना तूर्त निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात नियुक्त करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यावर याचिकेत तीव्र आक्षेप घेतला असून याबाबत पुढील आठवडय़ात सुनावणीची शक्यता आहे.
ममता बॅनर्जी संतापल्या!
निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभारावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. राज्यात कुठलीही अनुचित घटना घडल्यास निवडणूक आयोगाला जबाबदार धरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात थेट मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

























































