
पश्चिम बंगालच्या मालदा जिह्यात एसआयआरविरोधात निदर्शने करणाऱया आंदोलकांनी सात निवडणूक अधिकाऱयांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या अधिकाऱयांच्या वाहनांवर हल्ला करून गाडय़ांची तोडपह्ड करण्यात आली. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त करत राज्याचे गृह सचिव, पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकाऱयांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. न्यायालयीन अधिकाऱयांचे मनोबल कमी करणे आणि निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे, हा घटनेमागील हेतू असून हा पूर्वनियोजित कट वाटतो, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयात आज एसआयआरशी संबंधित याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी मालदामधील घटनेवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. पश्चिम बंगालच्या महाधिवक्त्यांना खडे बोल सुनावत सरन्यायाधीश म्हणाले की, तुमच्या राज्यात प्रत्येक जण राजकीय भाषा बोलतो. तुम्हाला काय वाटते, उपद्रवी कोण आहेत, हे आम्हाला ठाऊक नाही का? मी रात्री 2 वाजेपर्यंत प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून होतो. रात्री 11 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी तेथे उपस्थित नव्हते. मला तोंडी आदेश द्यावे लागले. यावर आंदोलन अराजकीय असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. त्यावर राजकीय नेते निदर्शनात काय करत होते, असा सवाल सरन्यायाधीश कांत यांनी केला.
सीबीआय किंवा एनआयएकडून चौकशीचे आदेश
मालदामधील घटनेबाबत सीबीआय किंवा एनआयएसारख्या स्वतंत्र संस्थेकडून तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. तपासाचा अहवाल तेथे न्यायालयात सादर करण्याचे स्पष्ट करत पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या अधिकाऱयांना 6 एप्रिल रोजी न्यायालयात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले. तसेच राज्यात पेंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेशही न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. याशिवाय राज्यात न्यायाधीश मुक्कामी असलेल्या विश्रामगृहांची सुरक्षा वाढवण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.
मालदामध्ये नेमके काय घडले?
मालदामध्ये न्यायालयाने नियुक्त केलेले सात निवडणूक निरीक्षक मालदाच्या बीडीओ कार्यालयात बुधवारी दुपारी पोहोचले होते. त्यात तीन महिलांचा समावेश होता. हे अधिकारी एसआयआरशी संबंधित प्रक्रियेचे काम पाहत होते. मतदार यादीतून नाव हटवण्यात आलेले शेकडो लोक तेथे सकाळपासून निदर्शने करत होते. निवडणूक निरीक्षक आल्याचे कळताच आणखी लोक तेथे गोळा झाले. त्यांनी अचानक कार्यालयाला घेराव टाकला. त्यांनी अधिकाऱयांना बाहेर पडूच दिले नाही. रात्री 11 वाजता पोलीस सुरक्षेत त्यांना सुरक्षित बाहेर नेण्यात आले. यावेळी पोलिसांची गाडीदेखील रोखण्याचा प्रयत्न निदर्शकांनी केला. निदर्शने गुरुवारीदेखील सुरूच होती. अनेकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 रोखून ठेवला तसेच रस्त्यावर टायरची जाळपोळ केली.



























































