
मुंबईत स्वयंपुनर्विकास प्रकल्पाने वेग पकडला असून आतापर्यंत स्वयंपुनर्विकासाचे 1600 प्रस्ताव आले आहेत. 21 सोसायटय़ा उभ्या राहिल्या असून सर्व इमारतीत अडीच ते तीन वर्षांत लोक राहायला गेली आहेत, अशी माहिती विक्रोळीत पार पडलेल्या स्वयंपुनर्विकासावरील मार्गदर्शन शिबिरात देण्यात आली.
विक्रोळी पूर्व टागोर नगर ग्रुप 1 येथील करुणा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या या शिबिराला मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक आमदार सुनील राऊत, माजी नगरसेवक चंद्रकांत निर्भावणे, विनायक शेजवळ, चंद्रकांत जाधव, रोशनलाल जैन, संजय सावंत, प्रदीप पगारे, सिद्धार्थ चंदनशिवे, पराग जाधव, सुहास बनसोडे, संदेश धोंदे, किशोर पवार यांच्यासह करुणा को-ऑप. सोसायटीतील रहिवाशी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला मोठे घर मिळतेय. स्वयं पुनर्विकासात एकही रुपया खिशातून घालावा लागत नाही. शासनाच्या सर्व परवानग्या विनाविलंब मिळतात. स्वयंपुनर्विकासात सभासद हा शेवटपर्यंत मालक असतो. सर्व सूत्र, नियंत्रण हे तुमच्या हातात असते. त्यामुळे चांगले दर्जेदार बांधकाम करू शकतो, असे यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले.
कन्नमवार नगर, टागोर नगरमध्ये राहणारा माणूस कष्टकरी, मध्यमवर्गीय आहे. आंबेडकर चळवळीचे लोक मोठय़ा प्रमाणावर येथे राहतात. म्हणून कष्टकऱयांसाठी ही वसाहत उभी करायची असून आपण सर्व जण मिळून ही योजना यशस्वी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



























































