सोशल मीडियावरील मैत्रीनं घात केला, अंधेरीतून गुजरातमध्ये नेऊन पुन्हा बलात्कार; आरोपीला मुंबईतून अटक

आधी कोलकाता आणि नंतर बदलापुरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. रोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला कधी न्याय मिळेल यासाठी देशभरात आंदोलने केली जात आहेत. मात्र ही परिस्थिती सुधरायचं काही नावंच घेत नाही. आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान या घटना ताज्या असताना आता मुंबईत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांना आरोपीला गोरेगाव येथून अटक केली.

आरोपी (21) आणि पीडितेची (13) आधी सोशल मीडियावरून मैत्री झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. आणि दोघांमधील मैत्री अधिक घट्ट झाली. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेला आमिष दाखवून अंधेरी येथे नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला गुजरातला नेले. गुजरातमध्ये गेल्यावर आरोपीने पुन्हा पीडितेवर तीन वेळा बलात्कार केला, अशी माहिती वाकोला पोलिसांनी दिली.

15 ऑगस्ट रोजी बराच वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. मात्र मुलीचा कुठेच पत्ता लागला नाही. मात्र दोन दिवसांनी मुलगी स्वत:हून घरी परतली. यावेळी घरच्यांनी तिची विचारपूस केली असता तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पीडितेने इंस्टाग्रामवरून त्याचा फोटो तिच्या कुटुंबीयांना दाखवला.

आरोपीची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ देखल घेतली असून आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.