राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी एक हजार रुपयांची तरतूद करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा; आदित्य ठाकरे यांची मागणी

सिंधुदुर्ग जिह्यातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन महिन्यांपूर्वी पडला. या घटनेमुळे आपल्या सर्वांनाच वेदना झालेल्या आहेत. आता त्या ठिकाणी शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा व्हायला हवा. पण पुरवणी मागण्यांमध्ये पुतळ्यासाठी फक्त एक हजार रुपयांची नोंद केली आहे. हा शिवरायांचा अपमान आहे. या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम द्या असे आपण सांगत आहोत. पण शिवरायांच्या पुतळ्यासाठी फक्त एक हजार दाखवणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना नेते व शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना त्यांनी उद्योग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशु व दुग्ध व्यवसाय विभागाच्या तरतुदींवर भाष्य केले.

मुंबईला तिसरा रन वे

पालघरच्या विमानतळासाठी महाविकास आघाडी सरकारने पेंद्र सरकारकडे मागणी केली होती. आता पालघर, रत्नागिरी, चिपी, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिकचा विमानतळ ही विमानतळं चोवीस तास काम करायला लागले तर स्थानिक जनतेला आणि उद्योग वाढवण्यासाठी खूप मोठा फायदा होईल. पालघरचा तर विमानतळ झालाच पाहिजे. कारण मुंबईजवळ तिसऱया रन वेची गरज आहे.

दोन वर्षांत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा कार्यक्रम झाला नाही. तो होणे गरजेचे आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कार्यक्रम आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. ते काम पुढे नेण्याची जबाबदारी राज्यात येणाऱया उद्योगमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

एक टक्काच दर आकारा

सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टय़ाने आणि कब्जेहक्काने दिलेल्या कलेक्टर लॅण्ड फ्री होल्ड करण्याचा दर एका टक्का करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, कलेक्टर लॅण्डची फ्री होल्ड लॅण्ड करण्यासाठी 15 टक्क्यांवरून एक टक्का करण्याची आमची मागणी होती, पण मुख्यमंत्र्यानी ती पाच टक्क्यांवर आणली आहे. याबद्दल त्यांचे आभार आहेतच, पण एक टक्का केल्यास अनेक लोकांचा फायदा होईल याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

मत्स्यव्यवसाय व दुग्धव्यवयास विभागावरील मागण्यांवर बोलताना ते म्हणाले की, कुलाबा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे त्या ठिकाणी मासे विक्री होते, पण मुंबई महानगरपालिकेने ही जागा लिलावात काढून सर्वांना महात्मा फुले मंडईत न्यायचे ठरवले आहे. त्या मच्छीमारांना त्याच ठिकाणी जागा द्या, पण आता छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे त्या ठिकाणी सुरू असलेली मासे विक्री बंद करू नका. कोळीवाड्यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, क्लस्टर डेव्हलमेंटमध्ये कोळीवाडे जाऊ शकत नाहीत. कोळीवाडय़ांचा विकास म्हणजे जशी घरे आहेत तशीच पक्की घरे दिली पाहिजेत, अशी सूचना त्यांनी केली.

वरळी डेअरीच्या संदर्भात ते म्हणाले की, वरळी डेअरी व वसाहत आहे. वरळी डेअरीमध्ये इमारत न बांधता ती जागा मुंबईकरांसाठी मोकळे मैदान किंवा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होऊ शकतो. वरळी डेअरी वसाहतीमधील इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांची दुरुस्ती होऊन डेअरीच्या कामगारांसाठी चांगली घरे आणि निवृत्त होणाऱया कर्मचाऱ्यांसाठी चांगली मोफत घरे आपण बांधू शकतो. पोलिसांसाठीही घरे होऊ शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.