
नायगाव येथील बीडीडी चाळींच्या जागी पुनर्विकास प्रकल्प उभा राहिला तरी अद्याप रहिवाशांना चाव्या का मिळाल्या नाहीत, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज नायगाव बीडीडी प्रकल्पाला भेट देऊन तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2021 रोजी नायगाव बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले, तरी चावी वाटप प्रलंबित असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी आपल्याकडे केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
घराचा ताबा न मिळाल्याने अनेक रहिवासी अजूनही भाडय़ाच्या घरामध्ये राहत आहेत. दर 11 महिन्यांनी त्यांना नवा भाडेकरार करावा लागत असल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
“प्रकल्प तयार असताना किती वेळा डीप क्लिनिंग करणार? मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने निर्णय घ्यावा,’’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. 16 मार्चला या रहिवाशांना चाव्या वाटप करण्याचे सरकारने ठरवले असल्याची माहिती मिळाली आहे. आमची भेट ठरल्यावरच चावी वाटपाची तारीख पुढे आल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.



























































