
घटस्फोटाच्या प्रकरणांतील पोटगीचा हेतू महिलेची आर्थिक स्थिती पुरुषाच्या बरोबरीने करणे नाही. महिलेला चांगले जीवन जगता यावे हा पोटगीमागील हेतू आहे. महिलांनी पतीला धमकावणे, जबरदस्तीने वसुली करणे किंवा त्याच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी कायद्याचा वापर करू नये, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.
बंगळुरू येथील एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येच्या घटनेवर अजूनही संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. या घटनेने कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. याचदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठाने दुसऱ्या एका प्रकरणात पोटगीबाबत टिप्पणी केली. 2021 मध्ये लग्न झालेल्या दाम्पत्याने घटस्पह्टासाठी अर्ज केला होता.
न्यायालय म्हणाले…
- महिलांनी कायदे त्यांच्या कल्याणासाठी केले आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे.
- कायद्याचा वापर पतीला धमकावणे, त्याला शिक्षा देणे, त्याच्यावर वर्चस्व गाजवणे, जबरदस्तीने वसुली करणे यासाठी करू नये.
- हिंदूंसाठी लग्न हा पवित्र संस्कार आहे. लग्नाला कुटुंबाचा पाया मानला जातो. त्याकडे व्यवसाय म्हणून पाहू नये.