अजय-अतुलच्या मुलाखतीने गाजला ‘पार्ले कट्टा’चा शतकमहोत्सवी सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात स्वतंत्र स्थान निर्माण केलेला ‘पार्ले कट्टा’चा शतकमहोत्सवी सोहळा विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात नुकताच साजरा झाला. सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या रंगतदार मुलाखतीमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांमधील दुवा ठरलेल्या ‘पार्ले कट्टा’ची सुरुवात 1 डिसेंबर 2007 रोजी झाली. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी विलेपार्ले येथील साठे उद्यानात भरणाऱया या कट्टय़ाने नुकतेच 100 कार्यक्रम पूर्ण केले. कट्टय़ाचा शतकमहोत्सवी सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अजय-अतुल या संगीतकार जोडीने त्यांचा आजवरचा प्रवास उलगडला. प्रज्ञा काणे आणि डॉ. अनुया पालकर यांनी या दोघांशी संवाद साधला. ‘आम्ही आता जे करतो आहोत, तेच आमचे स्वप्न होते आणि तेच स्वप्न आम्ही जगतो आहोत आणि त्याबद्दल मराठी माणसाचे ऋणी आहोत,’ अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. अजय यांनी यावेळी काही गाणी सादर केली. या दोघांना सुलेखनकार अच्युत पालव यांनी रंगवलेले दिमडी हे लोकवाद्य भेट देण्यात आले.

पार्ले कट्टाच्या संचालिका रत्नप्रभा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक दीपक घैसास, विश्वनाथ पेठे, आमदार पराग अळवणी, चंद्रकांत पवार, सावली चॅरिटेबल ट्रस्टचे करंदीकर, शशिकांत वैद्य, दीपलक्ष्मी पेठे, छाया पिंगे, चित्रा वाघ आदी उपस्थित होते.