
महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानणे अपेक्षित होते. मात्र मिंधे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बंदिस्त आहेत. या परिस्थितीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत,” अशा शब्दांत त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय पळवापळवीवर पोस्टद्वारे निशाणा साधला आहे.
View this post on Instagram
सरकारच्या या राजकारणावर अमित ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत. याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मतदारांनी मोठ्या आशेने मतदान केले असताना, निवडून आल्यावर जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी गायब होणे, हा सामान्य नागरिकांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजून किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या राजकीय नाट्याचा फटका केवळ लोकशाहीलाच नाही, तर सर्वसामान्यांनाही बसत असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा. ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा, असा टोला लगावत त्यांनी राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे.






























































