
अमरावती येथील औषध विक्रेता हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीला दणका दिला आहे. हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इरफान खान याचा दोषमुक्तीचा अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आरोपीविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत.
उमेश कोल्हे यांनी निलंबित भाजप नेत्या नूपुर शर्मा यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्याला समर्थन देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याच्या पार्श्वभूमीवर जून 2022मध्ये त्यांची अमरावतीत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी इरफान खान याने आपल्या अर्जात यूएपीए लावणे हे चुकीचे असल्याचा दावा करत सत्र न्यायालयात दोषमुक्ततेचा अर्ज केला होता. या अर्जावर अतिरिक्त न्यायाधीश चकोर बाविस्कर यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींनी विशिष्ट समाजघटकात भीती निर्माण करण्याच्या उद्देशानेच ही हत्या केल्याचे नमूद केले. तसेच हे कृत्य यूएपीएच्या कलम 15 अंतर्गत दहशतवादी कृत्य ठरते, असेही न्यायालयाने स्पष्ट करत आरोपीचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून लावला.



























































