
>> आशा कबरे-मटाले
मागोवा लोकल आणि ग्लोबल दिवाळीचा… आठवणीतल्या, हरवत चाललेल्या दिवाळीचाही
तुमची-आमची सगळ्यांचीच दिवाळी मोठी आनंदातच सरली असणार. सुंदर, नव्या कपडय़ांमधले देखणे फोटो बहुतेकांनी समाज माध्यमांवर टाकले, त्यावरून तरी तसं वाटतं. कित्येकांचे असे फोटो अद्यापही फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुन्हा पुन्हा डोकं वर काढत आहेतच. काही तरुण, नवोदित सेलेब्रिटींनी (अगदी मराठी सेलेब्रिटींनीही) आपला पहिला दिवाळसण खास ‘शूट’ करून त्याची रील्स चाहत्यांपर्यंत पोहोचवलेली दिसली. छानच आहे सगळं. देखणं, सुंदर, चमचमतं… हसरे, आनंदी चेहरे… फोटोत एकमेकांना बिलगून उभे राहिलेले कुटुंब सदस्य, मित्रपरिवार. या साऱया चमचमत्या पोस्टींमध्येच एक पोस्ट दिसली… फेसबुकवरच. पन्नाशीतल्या एका बाईंनी लिहिलं होतं… ‘दिवाळीला जशा आवर्जून शुभेच्छा पाठवता, तशीच आवर्जून अधूनमधून विचारपूसही करत चला. माणसाचं आयुष्य फार मोठं नसतं. कधी कधी कुणाच्या आयुष्यात अकारण असतो गुंता, दुःख, एकाकीपणा. हे फक्त माझ्याच संदर्भात नाही, तर आपल्या सगळ्यांविषयी आहे. तंत्रज्ञानाच्या अतिक्रमणात जगण्यातला मानवी स्पर्श हळूहळू पुसट होत चाललाय म्हणून म्हटलं.’
एकीकडे नजरेस पडलेली ही पोस्ट आणि दुसरीकडे दिवाळीत घरी पाहुणी आलेली एक लंडन निवासी मैत्रीण. खरं तर मैत्रिणीची बहीण. मूळच्या दोघीही उत्तर हिंदुस्थानी मुस्लिम, पण मैत्रिणीच्या बहिणीने मात्र दाक्षिणात्य हिंदू व्यक्तीशी लग्न केलेलं. म्हणजे तसा तिच्या सासरकडचा परिवार हिंदूच. या दोघीही बहिणी मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय मराठीबहुल वसाहतीत वाढलेल्या. त्यामुळे मुस्लिम असूनही दोघींच्याही मनात दिवाळीच्या चिक्कार आठवणी. नुकतीच लंडनहून मुंबईत आलेली पन्नाशीच्या उंबरठय़ावरची ‘ती’ अधाशासारखी आठवणीतली, बालपणीची ‘दिवाळी’ शोधत होती आणि तिच्या हाताशी काही लागत नव्हतं…‘लहानपणी आम्ही राहायचो तिथे सगळे घरीच कागद आणून कंदील बनवायचे, एकमेकांच्या घरी जाऊन करंज्या लाटायचे, ठिपक्यांची मोठी रांगोळी दारात काढायची, पण आधी ती झाकून ठेवायची. मग स्पर्धेत सर्वात सुंदर रांगोळ्यांची निवड जाहीर व्हायची…’ लंडनमध्ये अनेक वर्षं राहून नुकत्याच काही दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या त्या मुस्लिम स्त्राrला असं दिवाळीविषयी नॉस्टॅल्जिक होताना पाहणं विचारात पाडणारं होतं. सध्याचं आपल्याकडचं वातावरण काय! ‘ते आणि आपण’ जणु काही दोन तटांवर… अशी कठोर धारणा मनात बाळगून द्वेषाच्या चष्म्यातून सारं काही पाहणारे अनेक जण अवतीभवती आणि त्यात ही अशी मराठी दिवाळीसाठी आसुसलेली ‘ती’!
तिने दारातल्या पणत्यांचे फोटो काढले. माझी साच्यांनी छापलेली रांगोळी तिचा हिरमोड करून गेली. तेव्हा कशी रांगोळीची पुस्तकं असत आणि ते ठिपक्यांचे कागद. ती पुन्हा आठवणींत हरवली आणि चक्क ‘या फ्लॅट संस्कृतीत सारंच हरवलंय’ असं उदासवाण्या चेहऱयाने म्हणून गेली. ही अनेक वर्षं लंडनला राहिलेली बाई फ्लॅट संस्कृतीने हिरमुसली होतेय! मी विस्मयचकित.
मग ती फराळाच्या डब्यांत डोकावली. म्हणाली, ‘मला नं नवऱयासाठी अगदी अस्सल चवीचा मराठी फराळ न्यायचाय. कुठून घेऊ?’ माझ्याकडेही रेडीमेडच फराळ होता. मी सगळे पदार्थ तिच्या समोर ठेवले. तिने ते आवर्जून चाखले, पण तिच्या आठवणींतल्या चवींशी बहुधा ते जुळले नसावेत. दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधी शेजारीपाजारी घराघरांतून तयार होणाऱया फराळाचा दरवळ तिच्या आठवणींत गच्च रुतून बसलेला होता.
पाहुणी गेली. दुसऱया दिवशी कामावर आलेल्या स्वयंपाकाच्या बाईला मी सहजच विचारलं, “तू काय काय फराळाचं केलंस.’’ त्या टिपिकल कोकणी बाईकडून “नाही ताई, मी पण तयारच फराळ आणला’’ हे उत्तर मला अगदीच अनपेक्षित होतं, पण चक्क तिनेही घरी स्वतः फराळाचे पदार्थ बनवले नव्हते!
यंदाच्या दिवाळीत फक्त शेवटच्या दोन दिवशी शनिवार-रविवारी सुट्टी आल्याने अनेकांना रोजचा कामाचा व्याप सांभाळूनच दिवाळीची अवघी तयारी, दिवे-कंदील, रांगोळ्या, लक्ष्मीपूजन… सारं सारं पार पाडावं लागलं. एकटीने फराळाचा भार उचलणं आता अनेकींना झेपत नाही. घरी एखादी वयस्कर आई, आजी, आत्या, सासूबाई यापैकी जुन्या पिढीतलं कुणी असेल तरच आता बहुधा फराळ घरी होत असावा.
फराळासारखंच पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करणंही अनेक नोकरदारांच्या घरांत इतिहासजमा झालेलं दिसलं. एकतर नरकचतुर्दशीला सुट्टी नव्हती. पहाटे उठून मग काय ऑफिसात डुलक्या काढायच्या… असा बहुतेकांचा सरळसाधा हिशेब!
कंदील रेडिमेड, फराळ रेडिमेड, रांगोळ्याही आता रेडिमेडच. जमिनीवर चकत्या चिकटवल्या की, चमचमती रांगोळी तयार! बाकी थोडंफार लक्ष्मीची पावलं, शुभ-लाभ, स्वस्तिक, चार-दोन फुलं रांगोळीनं काढली की, पुरेसं होतं शास्त्रापुरतं. अर्थात पण अजून हौसेने रांगोळ्या काढणारीही खूप मंडळी आहेत.
बाकी सगळी लगबग मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाची! त्यातही यंदा कोणत्या मुहूर्तावर, शुक्रवारी की शनिवारी लक्ष्मीपूजन करायचं याची तुफान चर्चा रंगली समाज माध्यमांवर. उत्तर हिंदुस्थानी आणि मारवाडी मंडळींनी शुक्रवारी लक्ष्मीपूजन केलं तर बहुतांश मराठी मंडळींनी शनिवारीच. लक्ष्मीपूजनापाठोपाठ छान नटलेले फोटो फेसबुक-इन्स्टावर टाकताच दिवाळीच्या खरेदीचा अवघा खटाटोप सार्थकी लागला.
यंदाची दिवाळी हा ‘खरेदीचाच उत्सव’ होता म्हटलं तर हरकत नाही इतकी अफाट गर्दी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मॉल आणि बाजारांमध्ये रात्री उशिरापर्यंत दिसत राहिली. नक्कीच यंदा रेकॉर्ड ब्रेक उलाढाल झाली असणार. मागणीत मोठी वाढ होऊन यंदा सवाचार लाख कोटी रुपयांची उलाढाल देशातील दिवाळीदरम्यान होईल असा अंदाज ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स‘ या व्यापाऱयांच्या संघटनेने आधीच व्यक्त केला होताच. आपली अर्थव्यवस्था सुदृढ असल्याचं हे लक्षण मानायचं का, हे जाणकारच सांगू शकतील.
पण दिवाळीच्या दरम्यानच मुंबईतील पवई येथील उच्चभ्रू हिरानंदानी परिसरात एक दृश्य विचारात पाडून गेलं. या उच्चभ्रू वस्तीतल्या मध्यवर्ती रस्त्यावरच गेले काही महिने काही झोपडपट्टीवासीय फूटपाथवर तात्पुरती घरं बांधून राहत आहेत. त्या समोरच भर दिवाळीत एक बाई जुन्या कपडय़ांचा ढीग मांडून ते विकताना दिसली, तर तिथून थोडय़ाच अंतरावर असलेल्या कचरापेटीजवळ पडलेल्या जुन्या कपडय़ांचा ढिगारा उपसताना एकजण दिसला.
यंदा दिवाळी ग्लोबल झाल्याचंही बरंच कौतुक नजरेस पडलं. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली, अगदी आरतीही केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘व्हाइट हाऊस’मधल्या दिवाळी पार्टीत लष्करी बँडने ‘ओम जय जगदीश हरे’ची धून वाजवली. न्यूयॉर्कमधील सार्वजनिक शाळांना इतिहासात पहिल्यांदाच दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली. अर्थात या साऱयाचा यंदाच्या तिथल्या अध्यक्षीय निवडणुकांशी काही संबंध होता का, कोण जाणे?
दिवाळी रूप बदलत चालली असली तरी अजूनही ती खूप आनंददायी, चैतन्यमयी आहेच. कुठेतरी कुणी तरी म्हटलेलं वाचलं. दिवाळी ही व्हिटॅमिनच्या डोससारखी आहे. ती आपल्यात एक नवचैतन्य, आनंद-उत्साह निर्माण करते. जगण्याच्या रोजच्या धबडग्यातून वेळ काढून अधूनमधून असे आनंदसोहळे साजरे करणं ही आपली गरज आहे.