
>> चैताली कानिटकर
कुमाऊ हिमालयातील देवभूमी दुधाटोली. या पावनभूमीतून ट्रेकर म्हणून केलेला प्रवास नितांतसुंदर अनुभव देणारा ठरतो.
कुमाऊ हिमालयातील विस्तीर्ण कुरणांनी नटलेला दुधाटोली हा केवळ ट्रेक नव्हे, तर श्रद्धा आणि लोककथांनी जिवंत झालेला प्रदेश आहे. या ठिकाणाच्या नावामागे आणि अस्तित्वामागे एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते. लोककथेनुसार, देवी नंदा आणि स्थानिक देवतांचा वास या पर्वतरांगांमध्ये मानला जातो. त्यांच्या चरणस्पर्शाने येथील गवत इतके पवित्र आणि पोषक झाले की, येथे चरणाऱया गायींचे दूध विलक्षण प्रमाणात मिळू लागले. या प्रदेशात गायी चरण्यासाठी येत आणि त्यांच्या दुधाच्या धारांनी ही भूमी पावन होत असे, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या ठिकाणाला ‘दूध’ (पवित्रता, समृद्धी) आणि ‘टोली’ असे नाव मिळाले – दूधाटोली.
हा ऑफबीट ट्रेक हा ट्रेक पाच दिवसांचा असून जुलै, ऑगस्ट वगळता पूर्ण वर्षभर हा ट्रेक करता येतो. सोप्या श्रेणीत मोडणाऱया या ट्रेकचे एकूण अंतर 33 किमी आहे. या ट्रेकची सुरुवात आध्यात्मिक व सुंदर अशा ऋषिकेशमधून होते. थालिसैनमार्गे पीठासिनला जायला साधारण 7-8 तासांचा ड्राईव्ह आहे. वाटेत पौडी हे गढवाल प्रदेशातील चांगल्या हवामानाचे शहर लागते. हा मार्ग पाबोमधून पुढे जात थालिसैनला पोहोचतो. थालिसैन हे पौडी गढवाल जिह्याचे तहसील मुख्यालय व ट्रेक सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा मोठा बेस कॅम्पदेखील आहे. थालिसैनपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या पीठसैनपर्यंतच्या भागात ओक, देवदार जंगल, गावे, टेरेस्ड शेते पाहायला मिळतात. संध्याकाळी अक्लमटायझेशन वॉक करताना स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित असलेल्या वीर चंद्रसिंह गढवाली स्मारकाला भेट देता येते. तेथे हेलिपॅड ह्यूपॉइंट आणि मसौ, मैखोली, डांग, तौल्योन, जैती, मानसरी, किमवाडी आणि जंदरिया यांसारख्या जवळच्या गावांपर्यंतदेखील जाता येते. त्या दिवशी आराम करून दुसऱया दिवशी खरा ट्रेक सुरू होईल.
दुसऱया दिवशी कॅम्पसाईट सोडून 8,238 फूट उंचीवर असलेल्या बिनसर महादेवाकडे चालायला सुरुवात होते. ट्रेकचा पहिला भाग सोपा शेताचा आहे. येथे चालणे सोपे आहे. शिवाय वाटेत दगड ठेवलेले आहेत, ज्यामुळे चालणे कमी थकवणारे असते. हिरवीगार शेती, ओक, रोडोडेंड्रॉन, अल्नस नेपॅलेन्सिचं जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट, हवेतील गारवा यामुळे इथे चालणे सुखकर होते. पीठासैनपासून पुढे ट्रेकिंग केल्यानंतर करचट गावाच्या पुढची पायवाट बिलनोपर्यंत जाते. बिलनो हे घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक सुंदर छोटेसे कुरण आहे. येथे थोडा ब्रेक घेऊन पॅक लंचचा आनंद घेतो.
थोडय़ा विश्रांतीनंतर, ट्रेक पुन्हा सुरू होतो आणि बिनसर महादेवाकडे सुमारे 5 किलोमीटर वॉक करावा लागतो. या ट्रेकवर आजूबाजूला कडय़ांची आणि दऱयांची झलक दिसते. इथे जंगलाच्या मध्यभागी बिनसर महादेव मंदिर आहे. बिनसर कॅम्पसाईटवरून उदयरामुन खरककडे जाणारे ट्रेकिंग सुरू होते. ट्रेकच्या सुरुवातीला थोडासा उतार, ओक आणि रोडोडेंड्रॉनच्या झाडांचे जंगल आहे. ट्रेकचा हा भाग खूप थंड व शांत आहे. त्यानंतर पुढे भरमढुंगी हे ठिकाण येते. भरमढुंगीपासून 300 मीटर अंतरावर आपण धनझर येथे पोहोचतो. हा एक लहानसा मोकळा भाग जिथे मेंढपाळांच्या झोपडय़ा दिसतात. इथे खरे पर्वतीय जीवन अनुभवता येते. धनझरपासून 800 मीटर पुढे गेल्यावर, फिंचू उडय़ार हे ठिकाण लागते. ही एक लहान नैसर्गिक गुहा आहे जी पक्ष्यांचे घर म्हणून ओळखली जाते. फिंचू उडय़ारपासून सुमारे 200 मीटर अंतरावर खैदांडा हे सुंदर कुरण क्षेत्र लागते. हा मार्ग 1.5 किमी अंतर चालत उदयरामुन खरक कॅम्पसाईटवर पोहोचवतो.
ट्रेकचा 4 था दिवस खास म्हणता येतो, कारण हा समीट डे आहे. इथे सकाळची सुरुवातच धुक्याने आणि आजूबाजूच्या हिरवळीने होते. ट्रेकचा पहिला 1 किमी हा एक सरळ रस्ता जो लगडताल येथे पोहोचतो. त्यानंतर पुढची चढाई मुसखोर येथे घेऊन जाते, जे दुधाटोली ट्रेकचे प्रमुख आकर्षण आहे. मुसखोरमध्ये एका दगडावर रचलेले लहान बुरुज दिसतात. इथून 500 मीटर अंतरावर चोबट्टा (क्रॉस ट्रेल्स) दिसतात. या ठिकाणी लहान रस्ते असल्याने ट्रेक लिडरच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. चोबट्टापासून शेवटचे 2 किमी ट्रेक केल्यावर दुधाटोली येते. दुधाटोली कॅम्पसाईटवर पोहोचल्यानंतर, हिमालयाचे अद्भुत दृश्य दिसते.
पुढचा पाचवा दिवस दुधाटोली धांडा ट्रेकचा शेवटचा दिवस. या ट्रेलमध्ये चढाई आणि उतरण आहे. खरं तर प्रत्येक हिमालयीन ट्रेकचे हेच सौंदर्य असते. शेवटी सरळ रस्त्याने भरारीसैन हे ठिकाण येते, जे एक लहान डोंगराळ शहर आहे. इथे ट्रेक संपतो. थोडा वेळ विश्रांती घेऊन ऋषिकेशकडे परतीचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास 208 किमी अंतराचा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले हे क्षण आयुष्यातील नितांतसुंदर आठवणींसह कायम सोबत राहतात.




























































