अभिप्राय – विचारांचा अमृतानुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश कदम

वर्तमानपत्र किंवा मासिकातील लेखांच्या संग्रहाचं पुस्तक हा आपल्याकडचा एक प्रचलित प्रकार, पण अशा पुस्तकांना रुसाहित्य म्हटलं जात नाही. कारण स्तंभलेखन हे बऱयाचदा माहितीपर असतं. ते वाचनीय नसतं असं नाही, पण साहित्याला निर्मितीची अट असते. साहित्यिकाने आपल्या प्रतिभेने काहीएक निर्मिती करावी अशी अपेक्षा असते. इकडून ऐकलं-वाचलं आणि तिकडं छापलं म्हणजे साहित्य होत नाही. यात चूक आहे असं म्हणता येत नाही, पण हा नियम सरसकट सर्व स्तंभलेखनाच्या पुस्तकांना लावता येत नाही.

डॉ. दिलीप पांट्टे यांच्या ‘मनाच्या सतारीचे बोल’ या पुस्तकाबद्दल हेच म्हणता येईल. हे पुस्तक हा लेखांचा संग्रह असला तरी तो ‘काळ’बद्ध नाही. यात जसे तत्कालीक विषयावरील लेख आहेत, तसेच ललित लेखही आहेत. हे लेख वाचकांना एक आगळावेगळा अनुभव देतात.

पांट्टे हे गझलकार आणि कवी मनाचे लेखक, पण म्हणून त्यांच्या या पुस्तकात फक्त लेखक, कवी आणि पुस्तकांची चर्चा नाही. चालू राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर वेगळ्या नजरेतून केलेलं भाष्यही यात आहे. हे लेख लेखकाची संवेदनशीलता दाखवणारं आहेत. ‘मेरा भारत (खरोखरच) महान’ हा व्याख्यान ऐकून लिहिलेला लेख असाच विचार करायला लावणारा आहे. ‘जगण्याची महागडी कला’ हा श्री श्री रवीशंकर यांच्यावरील लेख एक वेगळा विरोधाभास उघड करणारा आहे. ‘मिस्टर एनीबडी’ हा अभिनेता शाहरुख खान याच्यावरचा लेख त्याच्या अभिनयाची आणि लोकप्रियतेची झलक दाखवणारा आहे. ‘किडनी वक्कम’ हे किडनी विकण्याची परंपरा असलेले गाव आणि मध्य प्रदेशातल्या एका गावातील धोंडेमारी जत्रेवरील लेख अंतर्मुख करायला लावतात.

तस्लिमा नसरीन, साने गुरुजी, सुरेश भट, अब्दुल कलाम, शाहीर रामजोशी, यशवंत देव यांच्याबद्दलचे लेख वाचकांना समृद्ध करणारे आहेत. आनंदवनातल्या चपला, रेघ होऊन वर्तुळ सोडण्यासाठी… हे लेखही उत्तम जमले आहेत. पांट्टे यांचं हे पुस्तक म्हणजे अनुभव, चिंतन, आठवणी, व्यक्तिचित्रणांचा आकर्षक कोलाज आहे. स्तंभलेखनाच्या मर्यादेमुळे असेल सर्व लेख आटोपशीर आहेत. त्यात पाल्हाळ नाही. डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे पांट्टे यांचा हा लेखसंग्रह म्हणजे सकारात्मक आणि प्रबोधनात्मक विचारांचा अमृतानुभव आहे. हा अनुभव वाचकांनी आवर्जून घ्यायला हवा.