बोलीभाषेची समृद्धी- चंदगडी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिह्यात चंदगड हा तालुका आहे. या तालुक्याचे स्थान पाहता या तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटक राज्य, पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि दक्षिणेला गोवा राज्य आहे. या परिसरात ‘चंदगडी बोली’ बोलली जाते.

 चंदगडी बोली उच्चारदृष्टय़ा वैशिष्टय़पूर्ण असून विशिष्ट हेल काढून बोलणे ही या बोलीची खासियत आहे. शब्दसंग्रह उच्चाराचा विशिष्ट हेल व्याकरणिक विशेष सर्वच बाबतीत चंदीगड बोलीचे वेगळेपण दिसून येते कोणत्याही विस्तृत प्रदेशात भाषा बोली एक सारख्या आढळत नाहीत. त्याचप्रमाणे चंदगड तालुक्यामध्ये देखील बोली मध्ये वेगवेगळेपणा आढळतो.

चंदगडी बोली ही प्रमाण मराठीशी नाते सांगणारी परंतु शब्दसंग्रह व्याकरणिक व्यवस्था, उच्चार वैशिष्टय़े इत्यादी संदर्भात स्वतचे वेगळेपण जपलेली बोली आहे. या बोलीचा अभ्यास मराठीची बोली म्हणूनच करावा लागतो. चंदगडी बोली शब्दसंग्रह व उच्चार विशेष यांच्या आधारे या बोलीच्या निर्मिती ऐतिहासिक कल्पना करता येते. चंदगडमध्ये सण, उत्सवाच्या वेळी  गाणी गाण्याची प्रथा आहे. या गाण्यांना चंदगडी बोलीत ‘गित्ती’ म्हणतात.

प्रमाण भाषेपेक्षा बोली जिवंत आणि अधिक प्रभावी असतात. त्यामुळे एखाद्या विस्तृत प्रदेशातील बोली सर्वत्र एकसारखी आढळत नाही. बोलीतील शब्दांचे उच्चार, हेल यांची तुलना प्रमाण भाषेची करता वेगळेपण लक्षात येते. उदा. ‘वसुला’ हा शब्द प्रमाण मराठीतील वसूल, वसुली या शब्दाची संबंधित आहे. चंदगडी बोलीतील ‘वसुला’ हा शब्द ‘वशिला’ या अर्थाने वापरला जातो. ‘वट’ हा शब्द ‘हुकूमत’ या अर्थाने वापरला जातो. तर ‘वट्टात’ हा शब्द चंदगडी बोलीत दोन भिन्न अर्थाने प्रचलित आहे. ‘मिय्या वट्टात वाटणी देऊसकी न्हाय’ या वाक्यामध्ये तो अजिबात या अर्थाने येतो. ‘आमी वट्टात श्यात करू लावात’ या वाक्यात तो एकत्र या अर्थाने वापरतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

या बोलीत तीय्या, तुमी, आमी (द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे), त्यो, ती, त्ये (तृतीय पुरुषवाचक सर्वनामे), ह्यो, ह्ये, त्यो, ती, त्ये (दर्शक सर्वनामे), जो, ज्ये, ज्या (संबंधी सर्वनामे), कोन, काय, खाल्ल्यास, खल्यान (प्रश्नार्थक सर्वनामे), कुणास, कोण (सामान्य सर्वनामे), आपनास, आमच्या (आत्मवाचक सर्वनामे) या सर्वनामांचा प्रामुख्याने वापर केला जातो. दांडगा (मोठा), बुरसा(घाणेरडा), आंबरसुका(ओलसर), कळकोटा (भांडणे काढणारा), धबला (जाडा), काटकोळा (बारीक) अशा प्रकारची विशेषणे वापरली जातात. अशा बोलींचा गोडवा ही बोली जितका काळ ती बोलली जाईल तितका अधिक टिकणारा आहे.