
>> श्रीनिवास पेंडसे
कोकण प्रांतातील येसाजी रघुनाथ यांनी सन 1733 मध्ये कोकणात येण्याचे आमंत्रण देताना थोरले बाजीराव पेशवे यांना लिहिलेल्या पत्रात कोकणचा परिचय देताना ‘कोकण म्हणजे नवनिधी आहे,’ असे यथार्थ वर्णन केले आहे. याच कोकणच्या मातीत अनेक नवरत्ने जन्माला आली. माणकांतील हीच चमक हेरण्याची अचूक दृष्टी जे. डी. पराडकर यांना लाभली आणि त्यातूनच साकार झालं ‘कोकणची माणकं’ हे पुस्तक.
‘कोकणची माणकं’ हे पुस्तक केवळ व्यक्तीचित्रण नाही तर कोकणचा सांस्कृतिक जडणघडणीचा ताळेबंद आहे. ‘गजाभाऊ’ या पहिल्याच प्रकरणात कोकणच्या तत्कालीन खानावळ संस्कृतीचा परिचय होत असताना शेव-चिवडा, लाडू आणि उसळ पाव बदलत्या वेगवान प्रवाहात आता दुर्मिळच झाले आहेत. त्यात वर्णन केलेली बैलगाडीतून नाटक पाहण्यासाठीची सफर लुटणारी आमची शेवटचीच पिढी. ‘गजाभाऊ’ वाचताना हे कोकण डोळ्यांसमोरून तरळून जाते.
‘चिंत्या’ या कथेतलं नाटय़वेडही असंच कोकणच्या संस्कृतीशी मिलाप साधणारे. वि. वा. लेले हे माझे शिक्षकच. त्यांचं वर्णन प्रत्यक्ष व्यक्ती डोळ्यासमोर उभं करणारं आहे. या चित्रणात भोंडल्याचा संदर्भ येतो. संस्कृतीची पाळमुळं खोलवर दडलेली असतात. अस्तंगत होत पाहणारा भोंडला आजही कसब्यामध्ये जपला जातोय हे महत्त्वाचं आहे. संख्याशास्त्र हे ज्यांच्यावर लिहिलंय तेही परिचयाचे मात्र व्यक्ती वर्णनासोबतच शिंपणं उत्सव आणि बैलगाडीची मजा हे गजाभाऊंच्या वर्णनातील बैलगाडीच्या वर्णनाप्रमाणे उत्तमच. त्यातही मुलांनी करमणूक म्हणून केलेली चुकीची गोष्ट सोडून न देता गोल्डन गॅंगचा किस्सा शब्दांच्या वापरांनाही अर्थ प्राप्त करून देणाऱया पिढीचा गौरव आहे.
शब्द हे निरर्थक नसतात तर त्या शब्दांना ब्रह्म स्वरूप असतं. शब्द तोलून मोलून वापरणारी ही या किश्यातील जिद्दच भाषेला अभिजातता देत असते. प्रभूची माया अस्वस्थ करणारी खरीच, मात्र त्यातील गोधडी मन हेलावून सोडते. गोधडी हे निव्वळ वस्त्र नाही तर अनेक पिढय़ांचा संस्कार आहे. आजी पणजीची सुती लुगडी, जुनी झालेली तरीही ऊब देणारी. त्यांना धाग्यात शिवायचं आणि जुन्या नव्या संस्कृतीचा बंध दृढ करायचा. कोकणच्या हवामानाची सुसंगत विविध कपडय़ांनी धाग्यांच्या सुरेख शिस्तबद्ध गुंफणीनं एकजीव झालेली गोधडी जुन्या-नव्याचा संगम तर आहेच, पण पिढय़ांना जोडणारी माणसं गुंफणारी कुटुंब एकजीव करणारी उत्तम शिकवण आहे. जुने झाले म्हणून ते टाकाऊ नाही तर काळाप्रमाणे नवीन बदल गुंफून पुढे जाण्याची ऊबदार देणगी आहे.
कै. शशी काका सप्रे हे चिरंजीव समाजसेवक खरेच. सतत माणसात राहणारा अवलिया. परिचय सुखद करणारे व्यक्तिमत्त्व चित्रण अप्रतिम! काष्ठ शिल्प म्हणजे अमूर्तातून मूर्तत्व पाहायला शिकवणारी कला. काष्ठासारख्या निर्जीव वस्तूंतून आकारांचे चित्र निर्माण करण्यासाठी सर्जनशीलता, कलात्मक दृष्टी यासोबतच सहृदयता असावी लागते आणि म्हणूनच अशा व्यक्तिमत्त्वाकडे काम करणारी शुभांगी घरातील मानाची सदस्यता मिळवू शकते. अशा निष्ठाच आत्मीयतेचा उत्तुंग आविष्कार निर्माण करू शकतात. हे ‘दृढनिष्ठा’ या प्रकरणातून दिसून येते.
कोकणातील खोतांवर अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या. खोती अनेक वेळा अत्याचारी होती, पण आदराने खोत आणि खोती लोकांनीही जपावी अशीही उदाहरणे कोकणच्या भूमीवर दुर्मिळ का होईना, पण आहेतच हे दाखवणारे चित्रण आणि वाचन हे व्यसन, म्हणून अशा व्यसनाचाही आदर्श असावा असं वाटणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे आंबेड खूर्दचा खोत. ‘मला आय.ए.एस. व्हायचंय’ ही कथा दिलासादायक आणि महाराष्ट्रातील विद्यमान पिढीला असं वाटतं याचं समाधान देणारी आहे.
पुंडाच्या कथेनं परत एकदा पूर्वीच कोकण उभं केलं असून स्वतचे दुःख विसरून इतरांशी समरस होणारा पुंडय़ा भावून जातो. या कथेतील आटय़ापाटय़ांचा खेळ कोकणात अस्तित्व शोधतोय हे दुःख आहे. बटय़ा भिल्ल ही खरी तर भटक्या विमुक्त समाजाची आत्मकहाणीच आहे. ‘कोकणची माणकं’ या पुस्तकात चितारलेली व्यक्तिमत्त्वं सुंदर तर आहेतच, पण या सुंदरतेला काही वेदना, यातनाही आहेत. वेदना आणि यातना असूनही ते संचित मानून जगणारं कोकण आहे. म्हणूनच या अपार दुःख आणि वेदनेतही कोकणात आनंद शोधणाऱया या कथा आहेत. हलक्या फुलक्या वाटणाऱया व्यक्तींनाही वेदनांच्या आणि यातनांच्या झालरी असतात. पुलंच्या कोकणातील व्यक्तिचित्रणातही विनोदाने हसता हसता दारिद्रय़, परिस्थिती यांच्या विनोदी अंगाने मांडलेल्या व्यक्तीवर्णनेसुद्धा डोळ्यांच्या कडा ओलावतात. या पुस्तकातही सामान्य किंवा असामान्य परिस्थितीत झगडणारं कोकण शब्दरूप होतं आणि वाचन पूर्ण झाल्यावर हेच शब्द दीर्घकाळ मनात शब्देविण संवाद करीत राहतात. म्हणूनच हे पुस्तक आवर्जून वाचावे आणि अनुभवावेसुद्धा.
कोकणची माणकं
लेखक ः जे. डी. पराडकर
प्रकाशक ः चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठ संख्या ः 136 n मूल्य ः 250


























































